
सध्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही सत्तेत येऊ द्या दोन दिवसात मराठा आरक्षण देतो असे म्हणत होते. सत्ता हाती द्या म्हणणारे बेइमानांच्या चिपळ्या वाजवत बसलेत, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची मागणी अमान्य करत ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, प्रकरण न्यायालयात असताना सध्या उपमुख्यमंत्री असलेले सत्तेत आल्यावर दोन दिवसात आरक्षण देऊ म्हणत होते. तुमच्या हातात गेल्या 9 महिन्यांपासून सत्ता आहे. इतर सर्व निकाल, निवडणूक आयोग मॅनेज केले जातात, मग या महत्त्वाच्या विषयाचा निकाल आपल्या मनाप्रमाणे का लागला नाही? सीमाप्रश्नापासून ते मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल लागत नाहीय. या विषयावर बोलताना तुमची दातखीळ बसलीय का? शिवसेना पक्ष, धनुष्यबाण आमच्या हातातून काढून घेण्यासाठी तुमच्या बरोबर हालचाली सुरू होत्या. मग मराठा आरक्षणात कुठे कमी पडलात, हे लोकांसमोर येऊन सांगायला हवे, असेही राऊत म्हणाले.
आमचा अभंग, तुमचं किर्तन!
राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद झाला पाहिजे या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. आमचा अभंग आणि तुमचं किर्तन. पण तुम्ही खरंच किर्तन करताय का? तुम्ही जे करताय ते थोतांड आहे. अभंगाची चेष्ठा करू नका. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. ताकद असेल तर या अभंगाला उत्तर द्या. नुसते टाळ तरी कुटून दाखवा. तुम्हाला भीती वाटते आमची. तुमच्या पोटात गोळा आलाय. आमच्या अभंगामुळे महाराष्ट्रातील वातावरणात परिवर्तन होताना दिसतंय. आमचा अभंग अन्यायाविरुद्ध आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच खारघरला घडलेला प्रकार हिंमत असेल तर चिपळ्या वाजवून सांगा. किती लोकं मेले? कसे मेले? लाईट अँड शेड्स कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले? त्यांचा पार्टनर कोण? या कंपनीने मिंधे गटाचे कुठे-कुठे काम केले? खारघरचे काम कसे मिळाले? याची माहिती चिपळ्यांनी महाराष्ट्राला द्यावी, असेही ते म्हणाले.
बाहेर लोकं उपाशी, आत शाही मेजवाणी!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खारघर दुर्घटनेप्रकरणी दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याची मागणी केली असून त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, असे राऊत म्हणाले. मृतांचा आकडा 14-15 दिसत असला तरी खरा आकडा 50च्या आसपास असावा अशी भीती व्यक्त होतेय. लोकं उन्हात पाण्याशिवाय तडफडत होती. सात ते आठ तास त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता हे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. बाहेर उन्हात लोकं उपाशी तडफडत असताना त्याच ठिकाणी शामियाण्यामध्ये जेवणावळी आणि शाही मेजवाणी सुरू होती, याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. या सगळ्याची एकसदस्यीय समिती चौकशी करणार का? असा सवाल राऊत यांनी केला.
पोपटांना पोपटपंची करू द्या!
खारघर दुर्घटनेबाबत आयोजकांवर सदोष मनुष्यवधानाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असतानाच राज ठाकरे यांनी कोरोना काळातील मृत्युंकडे बोट दाखवले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, भाजपने पाळलेल्या पोपटांना पोपटपंची करू द्या. नोटाबंदीच्या रांगेत हजारो लोकं मेली, हा सदोष मनुष्यवध आहे ना. त्याच्यावर भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेतं वाहत आली, गुजरातमध्ये स्मशानात जागा नव्हती, मग गुजरात आणि यूपीच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधानाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरेंनी करावी.


























































