सरकारच्या डोळ्यामध्ये झालेल्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल, संजय राऊतांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूरच्या बारसू येथे आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज झालाच नाही असं म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “बारसूमध्ये लाठीचार्ज झाला नाही असं जर सरकार म्हणत असेल तर सरकारच्या डोळ्यामध्ये जो मोतीबिंदू झाला आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. महाराष्ट्रातले जे प्रमुख नेत्रोपचार तज्ञ आहेत त्यांना मी सांगेन की सरकारसाठी नेत्र चिकित्सा शिबीर घ्या आणि त्या सगळ्यांचे डोळे तपासा. त्याच्यामध्ये काय वाढलंय ते उपटून काढा.” अशा शब्दांत राऊत यांनी सरकारवर घणाघात केला. शनिवारी सायंकाळी ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.

“आंदोलनाच्या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या हे कॅमेरासमोर स्पष्ट दिसत आहे. आंदोलकांना पोलीस मारत आहेत आणि त्यात आंदोलक जखमी होऊन कोसळलेत हे माध्यमांनी दाखवलं. पोलीस ठाणे आणि न्यायालयात या सर्वांना घेऊन गेले. आता फक्त लष्कर आणायचं बाकी होतं. अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी ज्याप्रमाणे पोलीस फौजफाटा तैनात केला जातो त्याप्रमाणे राजापूरच्या आंदोलनाच्या ठिकाणी फौजफाटा उपस्थित होता. सरकारला हे दिसत नाही? सरकारचा एक डोळा मिंध्यांचा आहे तर एक डोळा फडणवीसांचा आहे. त्यामुळे दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. कारण सरकारला अजिबात दिसत नाही.” असे राऊत म्हणाले.

यावेळी मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले की, “सौदी अरेबियाच्या इस्लामिक रिफाययनरीची दलाली करणाऱ्या उदय सामंत यांच्या सारख्या मंत्र्याने आम्हाला सांगू नये काय चौकशी करणार आणि काय नाही ते. तुम्ही काहीही करा आम्ही लाठीमार, पोलिसांचा हल्ला, निर्घृण आणि अमानुष अत्याचार यावर बोलत आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या चौकश्या करायच्या आहेत त्या करा. खोट्या चौकश्या हा तुमचा धर्म आहे.

“रत्नागिरीत उद्धव ठाकरेंना पाय ठेऊ देणार नाही” या नारायण राणेंच्या विधानावर राऊत म्हणाले की, “नारायण राणेंच्या बापाचं आहे का? इथे पाय ठेऊ देणार नाही, तिथे पाय ठेऊ देणार नाही. आधी तुझे पाय कुठे आहेत ते बघ. अरे काय बोलताय तुम्ही? कोणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात आपण संयमाने बोला. पाय ठेऊ देणार नाही असं बोलायला कोणाची दलाली करताय तुम्ही? कोकणात आपण एकदा नाही तर दोनदा पराभूत झालेला आहात. आपल्याला लोकांनी पराभूत केलेलं आहे. त्यामुळे लोकं निर्णय घेतील. मला कोणाशी काही व्यक्तिगत बोलायचं नाही. उद्धव ठाकरेंना पाय ठेऊ देणार नाही असं म्हणण्यापेक्षा लोकांचं जाऊन ऐका. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात त्यामुळे प्रतिष्ठेने रहा, महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका.”

“आज महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका झाल्या त्यात कोणाची धूळधाण झाली याचा अभ्यास करा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे राज्यभरात आज जे निकाल लागले त्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी राज्यामध्ये घोडदौड करताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये शिवसेना कधीच भाग घेत नव्हती, मात्र सगळ्या गद्दार आमदारांच्या मतदारसंघामध्ये शिवसेना व शिवसेनेचे पॅनल हे जिंकले आहेत.”