जवानांची कत्तल उघड्या डोळ्यानं पाहणाऱ्यांच्या डोक्यात राम मंदिराच्या घंटा आपटल्या पाहिजे! – संजय राऊत

जम्मू-कश्मीरमधील पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदुस्थानचे पाच जवान शहीद झाले. 370 कलम हटवल्यानंतरही कश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले सुरू असून यात जवानांचा हकनाक बळी जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केली.

खासदार संजय राऊत म्हणाले, पुंछमध्ये लष्करी वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि पाच जवानांची हत्या झाली. भारतीय जनता पक्षाने देशाच्या सुरक्षेचा पूर्णपणे खेळखंडोबा केला आहे. एकाबाजुला देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान 370 कलम हटवण्याच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचा आनंद साजरा करत आहे. विरोधकांवर टीका करत आहेत. कश्मीर आमच्या हातात सुरक्षित असल्याच्या बाता मारत आहेत. तर दुसरीकडे संसदेत घुसखोरी सुरू आहे. संसदेच्या सुरक्षेला तडे जात आहेत. विरोधकांना चर्चा करू दिली जात नाही. खासदार निलंबित केले जात आहेत.

आम्ही 150 खासदारांना निलंबित केले या आनंदात सरकार मग्शूल असताना पुंछमध्ये लष्करी वाहनांवर पुलवामाप्रमाणे हल्ला झाला आणि 5 जवानांची हत्या झाली. पुंछमध्ये झाले ते मिनी पुलवामा आहे. पुलवामाविषयी आजही लोकांच्या मनात शंका आहेत. नक्की काय घडले? सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली? अशी शंका पुंछबाबतही आहे. गेल्या दोन महिन्यात जम्मू-कश्मीरमध्ये 100हून अधिक जवान मारले गेले आहेत. सरकारला लाज वाटत नाही का? एकाचवेळी 5 जवान मारले गेले आणि सरकार कोणता उत्सव साजरा करत आहे आणि कोणासाठी? विरोधी पक्षांची, खासदारांची कत्तल करायची आणि आपल्या जवानांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचे. या घंटाच त्यांच्या डोक्यात आपल्या पाहिजे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याची माहितीही खासदार राऊत यांनी दिली. शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनाही निमंत्रण नसते. कारण राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा श्रेय घेण्याचा, राजकीय चढाईचा भाग बनला आहे, असे राऊत म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेना, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. थंड बस्त्यात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे अयोध्येत गेल्यामुळे परत एकदा नस्ती सुटली. पण ते आम्हाला बोलावणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे तिथे गेले तर पुन्हा एकदा शिवसेनेचा जयजयकार होईल, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा जयजयकार होईल. त्यामुळे ज्यांचे योगदान आहे त्यांना ते सन्मानाने कधीच बोलवणार नाहीत. पण प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. ते एका राजकीय पक्षाचे किंवा एका नेत्याची जहांगीर नाही. त्यांचा राजकीय सोहळा झाल्यावर आम्ही धार्मिक उत्सव तिथे जाऊन करू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेना 23 जागा लढवणार

लोकसभेच्या जागावाटपाबाबतही राऊत यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे दिल्लीत आले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्याशी आमची याबाबत चर्चा झाली. मी आणि आदित्य ठाकरेही या बैठकीला उपस्थित होतो. त्या चर्चेत काय घडले हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होईल. आम्ही 23 जागा लढवणार असल्याचे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे, असेही राऊत स्पष्ट म्हणाले.

लोकशाही पायदळी तुवडण्याचा कार्यक्रम

अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळण्यात आले. यावरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. सर्वकाही राजकीय सोयीने आणि राजकीय फायद्यासाठी चाललेय. लोकसभा, राज्यसभा चालू देत नाहीत, खासदारांचे निलंबन केले जात आहे. इकडे विधानसभा गुंडाळली जात आहे. देशातून संसदीय लोकशाही पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम योजनाबद्धरीतिने सुरू आहे. त्यात महाराष्ट्राही आपले पाऊल पुढे टाकतोय, हे दुर्दैव आहे, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.