संघाने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपवर होणाऱ्या टीकेवरही भाष्य केलं.

” लोकसेवकाला अहंकार नसावा असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मात्र गेल्या दहा वर्षात आपण या देशात फक्त अहंकार, इर्षा, सूडाचे राजकारण, सत्तेचा गैरवापर बघत आलो आहोत. भाजपची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था देखील हे सगळं बघत आली आहे. आम्हाला वाटलं होतं की संघाचे लोक निर्भयातेने समोर येऊन या अहंकाराचा विरोध करतील. ही आमची व जनतेची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. १९८५ ला देशात इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावली होती. तेव्हाचे सरसंघाचालक बाळासाहेब दिरस होते. त्यावेळी त्यांनी त्या हुकुमशाहीला विरोध केला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले होते. हे आम्ही विसरू शकत नाही. या देशात लोकशाही टिकवण्याठी संघाच्या काही नेत्यांचे योगदान राहिले आहे. मात्र गेल्या दहा वर्षात संघाची एकदम विपरीत भूमिका आम्ही पाहिली आहे. ”भाजपच्या अहंकाराला कुणी रोखलं आहे ते जनतेने रोखलं आहे. आम्हाला ही अपेक्षा आहे संघाकडून होती. मात्र सध्या ज्याप्रकारे संघ भाजपला खडे बोल सुनावत आहे. त्यावरून सध्या जे सत्तेत अहंकाराचे शिरोमणी बसले आहेत त्यांना लवकरच तुम्ही सत्तेपासून दूर करायचा प्रयत्न कराल. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही हे करू शकाल, असे आवाहन संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केले.

”भाजपने तीस पेक्षा जास्त जागांवर चोरी केलीय. तीस पेक्षा जास्त जागांवर भाजप हरली आहे. मात्र तिथे भाजपने दबाव आणून विजय मिळवला आहे. भाजप हरलीय, मोदी हरलेयत, शहा हरलयेत, वाराणसी, अयोध्या हरले, चित्रकूट, रामेश्वरम, रामटेक, नाशिकमध्ये हरले. जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झालाय. रावण अहंकारी होता म्हणून प्रभू श्रीरामाने त्यांचा वध केला. आज तोच अहंकार रामाच्या नावावर चालला होता. लोकशाहीत मतपेटीतून जनतेने अहंकाराचा पराभव घडवून आणला आहे. अद्याप ते पूर्णपणे पराजित नाही झाले्ले नाही त्यामुळे आता ते काम संघाला करावे लागेल. संघाने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही. मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग लावण्याचं काम जर संघ करत असेल तर ते त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत असं मी मानेन, असं संजय राऊत म्हणाले.

25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळय़ात पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी गुरुवारी सत्र न्यायालयात आक्षेप घेतला. त्याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. ”अण्णा हजारे जागे झाले त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. अण्णा हलले, अण्णा बोलले, अण्णांनी पत्र लिहलं त्यासाठी मी त्यांचे अभार मानतो. पण या महाराष्ट्रात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या दहा वर्षात घोटाळेच घोटाळे झालेले आहे. घोटाळ्यांचा पाऊस पडला आहे. इलेक्ट्रॉल घोटाळ, ईडी व सीबीआय़चा वापर करून जी खंडणी गोळा केली जाते तो घोटाळा, आयएनएस विक्रांत घोटाळा यावरही अण्णा हजारे यांनी आवाज उठवावा. एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या 40 आमदारांच्या घोटाळ्यांवरही लक्ष दिले पाहिजे. या विरोधात अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन आंदोलन करावे. आम्ही सर्व देखील त्यांच्यासोबत बसून आंदोलन करू, असे संजय राऊत म्हणाले.