संजू अन्याय मोडीत काढणार; यष्टिरक्षक नव्हे तर फलंदाज म्हणून टी-20 वर्ल्ड कपसाठी जोरदार बॅटिंग

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नेहमीच संजू सॅमसनवर अन्याय होत आलाय. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर संजू आपला अन्याय मोडीत काढण्यासाठी संघर्ष करतोय. त्याचा हा संघर्ष यशस्वी ठरेल आणि तो एक दमदार फलंदाज म्हणून टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी निवड समिती आपल्या आवडीचे खेळाडू निवडण्याची तयारी करत आहेत. हिंदुस्थानच्या 15 पैकी 8 ते 10 खेळाडूंची यादी तयार आहे आणि या यादीत यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतची वर्णी लागण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यातच यष्टिरक्षक फलंदाज असलेला लोकेश राहुलचे स्थानही पक्के मानले जात आहे. त्यामुळे संजू सॅमसनवर नेहमीसारखाच अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यष्टिरक्षक नव्हे फलंदाज

संजू सॅमसनने आयपीएलच्या पहिल्या पाच सामन्यांतच आपल्या बॅटचा धमाका केला आहे. त्याने आतापर्यंत ना. 68, 69, 12,15 आणि ना. 82 अशा अफलातून खेळी करत राजस्थानला सलग चार विजय मिळवून दिले आहेत. म्हणजेच संजू यष्टिरक्षक आणि फलंदाजच नव्हे तर कर्णधार म्हणूनही यशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्याचीही दखल निवड समितीला घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे यावेळी तो आपल्यावर आजवर होणारा अन्याय आपल्या धावांच्या वर्षावाने मोडून काढेल. जर तो यष्टिरक्षक म्हणून संघात बसत नसेल तर त्याची निवड फलंदाज म्हणून केली जायला हवी. संघात लोकेश राहुल बसू शकतो. अष्टपैलूच्या नावाखाली आलेला हार्दिक पंडय़ा गोलंदाजीत बिनकामाचा असूनही त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. तर संजू सॅमसनने निवड समितीचे काय घोडे मारले आहे. वयाच्या तिशीत पोहोचलेल्या संजूला त्याच्या गुणवत्तेवर आणि कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळायलाच हवे, असा सूर क्रिकेटप्रेमींनी आतापासूनच आळवायला सुरुवात केली आहे.

संजूची निवड शक्य ?

हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कप संघात संजू सॅमसनची यष्टिरक्षक म्हणून निवड कठीण आहे. सध्या ऋषभ पंतही फॉर्मात आहे आणि त्याची निवड होण्याची अधिक शक्यता आहे. तसेच संघात लोकेश राहुलचे स्थानही पक्के आहे. अशा स्थितीत दोन यष्टिरक्षक घेऊन जाणे निवड समितीलाही शक्य नाही. दुसरीकडे हिंदुस्थानी संघात आपला दावा करणारे अनेक मधल्या फळीतील आणि आघाडीचे फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे त्यांच्या जागी सॅमसनला न्याय मिळू शकतो. अपयशी खेळाडूंऐवजी फॉर्मात असलेल्या संजूचा निवड समितीने प्रामाणिकपणे विचार केला तर त्याला वगळणे अशक्य आहे.