केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर ‘मोदी सरकार गो बॅक’च्या घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर मोदी सरकार गो बॅकच्या घोषणा देत या रथाला तालुक्यातील मोहोज देव्हडे येथे काही तरुणांनी विरोध केला. नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव पाठोपाठ आता पाथर्डी या ठिकाणी अशा प्रकारचा विरोध झाल्यामुळे एकच खळबळ जिल्ह्यात उडाली आहे.

कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या योजना या गोरगरिबांपर्यंत पोहोचवा सामान्य पर्यंत जा असा संदेश वजा आदेश हा देण्यात आलेला आहे. त्यानुसार भाजपसह शासकीय यंत्रणाही आता चांगलीच कामाला लागलेली आहे. पण दुसरीकडे गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता तीव्र संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. मागील आठवड्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये अशाच प्रकारची यात्रा अडवून त्या समोर कांदा टाकून आंदोलन करण्यात आले तर आता पाथर्डीमध्ये सुद्धा हा विषय पुढे आला. शेतकऱ्यांनी थेट केंद्र सरकार व हल्लाबोल करत आमच्या 15 लाख रुपयांचे काय झाले असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संकल्प विकसित भारत ही संकल्पना घेऊन सध्या गावोगावी संकल्प रथ फिरवला जात असून हा रथ मोहोज देव्हडे गावात आल्या नंतर गावातील तरुण आदिनाथ देव्हडे,गोरख देव्हडे यांनी हा रथ अडवत रथा सोबत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना गावातून निघून जा असा सल्ला दिला. या वेळी बोलताना आदिनाथ देव्हडे म्हणाले की, या रथाचा खर्च मोठा हा खर्च नागरिकांच्या खिशातून केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले मात्र ते पाळले नाही. कांद्याची निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे.

दुधाच्या भावात मोठी घसरण झाली असून तीच परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.महागाई मुळे सर्वसामान्याना जगणे कठीण झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचाराचा भाग असल्याचा आरोप करत या रथाला देव्हडे व इतर तरुणांनी विरोध दर्शवला. यावेळी गोरख देवढे, रावसाहेब देवढे, ऋषीकेश गर्जे, डॉ.आदिनाथ देवढे, भारत देवढे, किरण देवढे, मच्छिंद्र देवढे, लक्ष्मण काळे, कैलास देवढे हे उपस्थित होते.