सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याला गुजरातमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. संतोष जाधवचा मागील अनेक दिवसांपासून पोलीस शोष घेत होते. रविवारी रात्री उशिरा त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्याचा साथीदार सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे याला संगमनेर मधून अटक केली होती.

पंजाबमध्ये 29 मे रोजी गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती. संबंधित खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी आठ संशयित हल्लेखोरांबद्दल माहिती काढून तपासाला गती दिली. त्यामध्ये मंचरमधील सराईत संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश असल्याची शक्यता आहे. पुर्ववैमनस्यातून सराईत संतोष जाधव याने साथिदारांसह मिळून ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याच्यावर पिस्तूल मधून गोळ्या झाडून खून केल्याची घटना ऑगस्ट 2021 मध्ये घडली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, यांच्या पथकाने केली.