संतोष कुमार घोष ट्रॉफी 3 जानेवारीपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्पार्टंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने घेण्यात येणारी 8वी संतोष कुमार घोष (16 वर्षांखालील) मुलांची क्रिकेट स्पर्धा 3 ते 16 जानेवारी या कालावधीत खेळविण्यात येणार आहे. मुलांमध्ये खेळपट्टीवर दीर्घकाळ उभे राहून खेळण्याची सवय व्हावी म्हणून या स्पर्धेतील सामने दोन दिवसांचे खेळविण्यात येणार आहेत. आझाद, क्रॉस आणि ओव्हल मैदानावर हे सामने होणार असून अंतिम फेरीचा सामना 15-16 जानेवारीला एम.आय.जी. येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेला हंसाबेन मेहता आणि युनियन बँक ऑफ इंडिया हे सहप्रायोजक आहेत.

मुंबईच्या विविध भागांतून येणारे आणि मुंबई क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारे 16 क्लबचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेतील सामने हे एम.सी.ए.च्या नियमावलीप्रमाणे खेळविण्यात येणार असून स्पर्धेतील विजयी संघाला संतोष कुमार घोष ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. शिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अशा पुरस्कारांसह प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूलाही ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल.  

स्पर्धेत सहभागी होणारे संघ :   न्यू ईरा    व्ही.एस.टी. जिमखाना   पोलीस जिमखाना   महाराष्ट्र यंगस्टर्स   स्टायलो सी.सी.   युनायटेड क्रिकेटर्स   एम.आय.जी.   माझगाव सी.सी.   स्पार्ंटग युनियन   पय्याडे सी.सी.   नवरोज   शांतीभाई शेठ   लॉर्ड नॉर्थ ब्रूक   दहिसर स्पोर्ट्स क्लब   दिलीप वेंगसरकर फौंडेशन   के.आर.पी. इलेव्हन.

बिपीन फुटबॉल ऍकॅडमीच्या आंतर केंद्र फुटबॉल स्पर्धेला शनिवारी दणक्यात सुरुवात झाली. हिंदुस्थानचा माजी फुटबॉलपटू स्टीवन डायस व महाराष्ट्राचा माजी खेळाडू गिरीश नायर यांच्या उपस्थितीत कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. सलामीच्या लढतीत कांदिवली केंद्राने कल्याण केंद्राचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवताना आपली चमक दाखवली.