किरकोळ भांडणातून मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळले, सातारा तालुक्यातील पाटखळ येथील घटना; चौघांना अटक

मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील पाटखळ येथे घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिल मधुकर शिंदे (वय 56, रा. पाटखळ, ता. सातारा) यांचा आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चौघांना अटक केली असून, अन्य एकजण फरारी आहे.

अनिल शिंदे यांचा मुलगा प्रज्ज्वल आणि संशयित शिवजीत माने (रा. पाटखळ) या दोघांची मैत्री होती. त्यामुळे त्याची प्रज्ज्वलच्या घरी ये-जा असायची. वर्षभरापूर्वी प्रज्ज्वलचे लग्न झाले. त्यावेळी लग्नामध्ये धक्का लागल्याच्या कारणातून शिवजीतची वादावादी झाली होती. त्यामुळे दोघा मित्रांमध्ये बोलणे बंद झाले होते.

मात्र, पूर्वीचा राग मनात धरून शिवजीत तीन मित्रांना सोबत घेऊन शिंदे यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात प्रज्ज्वलची आई उज्ज्वला शिंदे या एकटय़ाच होत्या. प्रज्ज्वल पुण्यात आणि वडील बाहेर गेले होते. प्रज्ज्वलला आता फोन करून माफी मागायला सांगा, असे त्याच्या आईला तो सांगत होता. आईने हो, सांगते, तुम्ही दोघे भांडू नका, असे सांगितले. त्यानंतर तेथून ते सर्व निघून गेले. परंतु, काही वेळानंतर प्रज्ज्वलचे वडील अनिल शिंदे हे दुचाकीवरून घरी आले. याचवेळी शिवजीतने पाठीमागून येऊन सोबत आणलेली पेट्रोलची बाटली त्यांच्या अंगावर ओतली. त्यानंतर लायटरने आग लावली. अनिल शिंदे आरडाओरडा करत असल्याचे पाहून त्यांच्या पत्नी धावत घरातून बाहेर आल्या. क्षणाचाही विलंब न करता अनिल शिंदे यांनी अशा अवस्थेतही बोअरचे बटण सुरू केले. स्वतःच पाण्याचे फवारे अंगावर घेऊन पेटते शरीर विझविले. या प्रकारानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले.

जखमी शिंदे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत शिंदे 56 टक्के भाजले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुख्य संशयित शिवजीतसह चौघांना पोलिसांनी अटक केली. अनिल शिंदे यांच्या मृत्यूनंतर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एवढा राग मनात असेल वाटले नव्हते

माझ्या मुलाची आणि त्याची चांगली मैत्री होती. तो आमच्या घरात सतत यायचा. जेवणही करायचा. पण दोघांमध्ये किरकोळ मतभेद झाल्यानंतर तो माझ्या मुलाचा एवढा राग मनात ठेवून असेल, याची कल्पनाही नव्हती. पूर्ण तयारीनिशी तो पेट्रोल घेऊन आला होता, असे उज्ज्वला शिंदे यांनी सांगितले.