सातारा जिल्ह्यात पाच महिला चालकांच्या हाती लालपरीचे स्टिअरिंग, कोरोनामुळे रखडलेले प्रशिक्षण अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पहिल्यांदा एसटी महामंडळात महिला चालक म्हणून महिला काम करणार आहेत. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील विविध आगारांत पाच महिलांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग येणार आहे. कोविडच्या काळात रखडलेले महिला चालकांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. राज्यभरात 160 महिलाचालकांकडे लालपरीचे सारथ्य करण्याची जबाबदारी येणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एसटी महामंडळातही विविध विभागांत महिला कार्यरत होत्या. राज्यभरात एसटीच्या वाहक म्हणून चार हजार महिला काम करत आहेत. मात्र, चालक म्हणून कोणतीही महिला काम करत नव्हती. त्यामुळे 2019 मध्ये महिला चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात राज्यातील 21 विभागांत 600 महिलांचे अर्ज आले होते. या अर्जांमधुन सर्वसाधारण भागातील 194, तर आदिवासी भागातील 21 महिला चालकांची निवड करण्यात आली. यात सातारा जिल्ह्यातील पाच महिला चालकांचा समावेश आहे. प्रशिक्षणानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणीनंतर या महिला चालक 2021 मध्ये रुजू होणे अपेक्षित होते. मात्र, 2019 मार्च महिन्यापासून कोविडचे संकट सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण रखडले होते. दीड ते दोन वर्षे गेल्यानंतर पुन्हा अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू झाले. महिला चालकांचे प्रशिक्षण एक वर्षाचे असून, आता केवळ अडीच महिन्यांचे प्रशिक्षण राहिले आहे. पुण्यातील भोसरी येथे एसटीचा टेस्टिंग ट्रक आहे. तेथे अंतिम चाचणी होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पाच महिला चालक एसटीच्या सारथी बनण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

घाट रस्त्यावर प्रशिक्षण

सातारा जिल्ह्यातील पाच महिला एसटी चालक प्रशिक्षणार्थींना दररोज दहा ते बारा किलोमीटर महाबळेश्वर, चाळकेवाडी येथील घाट रस्त्यावर बस चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. वाहतुकीचे चौक, घाट रस्ता, रात्रीच्या वेळेस येणारे अडथळे, राष्ट्रीय महामार्ग, गर्दींच्या ठिकाणांवर एसटी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.