
सातारा जिल्ह्यात शिवसेनेत फूट पडल्याचा पुरुषोत्तम जाधव यांचा दावा फसका असून, खंडाळा तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी करत जाधव यांच्या दाव्यातील हवा काढून टाकली. अफवा व भूलभूलय्याकडे लक्ष न देता पक्षसंघटना भक्कम करण्याचा निर्णय सर्व पदाधिकाऱयांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरुषोत्तम जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकासमवेत सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत, जिल्ह्यातील सातशे शिवसैनिक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख यशकंत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पुरुषोत्तम जाधव यांच्याच खंडाळा तालुक्यात पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीला सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवसेना उपनेते, सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील तसेच पदाधिकाऱ्यांबाबत जाधव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा यावेळी निषेध करण्यात आला.
खंडाळा तालुक्यातील सर्क पदाधिकारी व शिवसैनिक दलबदलू नेत्यांच्या मागे न धावता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे यशवंत घाडगे यांनी बैठकीत सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी खंडाळा तालुका शिवसेना पदाधिकारी बांधील असल्याबाबतचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी फॉर्म भरून सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सर्व पदाधिकाऱयांनी मिळून संघटनात्मक बांधणी मजबूत करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला 50 लाख सभासद नोंदणीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी 20 हजार नवीन सक्रिय सभासद नोंदणी करण्याचा संकल्प जाहीर केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अजित यादव, तालुकाप्रमुख संतोष मुसळे, खंडाळा शहरप्रमुख गोविंद गाढवे, उपशहरप्रमुख प्रमोद शिंदे, मंगेश खंडागळे, अमोल गाढवे, वाई शहरप्रमुख किरण खामकर, दत्तात्रय राऊत, युवासेनेचे समीर वीर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शारदा जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, आदेश जमदाडे, कल्पना पवार, विभागप्रमुख सागर ढमाळ, सागर कदम, अभय ननावरे, यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.






























































