
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार होता. मात्र, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोदी यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आल्यामुळे नाराजीच्या तोफा वाजू लागल्या आहेत. मोदी यांनी निदान छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा होता, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केली. दरम्यान, किल्ले शिवनेरी येथेही पंतप्रधान मोदी येणार असल्याची जोरदार चर्चाही सुरू होती.
सातारचे राजघराणे तसेच शिवभक्तांच्या वतीने शिवजयंती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ प्रदान करण्यात येणार होते. तसेच शिवजयंतीसाठी पंतप्रधान शिवनेरीवर येणार असल्याची चर्चाही जोरात सुरू होती. मात्र, सातारा येथील सन्मान स्वीकारण्यासाठी मोदी येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सातारकर नाराज झाले.
शिवजयंतीदिनी (दि. 19) सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सातारा प्रशासनाची तयारी सुरू होती. शहरात स्वच्छतेबरोबरच सैनिक स्कूल मैदान कार्यक्रमासाठी सुसज्ज केले जात होते. शिवरायांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी मैदानाची पाहणी करून सोहळ्याच्या नियोजनाला गती दिली होती. मात्र, आता मोदी हा सन्मान स्वीकारण्यासाठी मोदी येणार नसल्याचे संकेत मिळाल्याने सातारकरांनी नाराजी व्यक्त केली. शिवप्रभूंच्या राजघराण्याच्या व शिवभक्तांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठsचा सन्मान स्वीकारण्यासाठी पंतप्रधानांनी न येणे हा एक प्रकारे छत्रपतींच्या गादीचा अनादर केल्यासारखे आहे, अशा तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहेत. मोदींनी छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शिवभक्तांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान यांनी सोहळय़ाला ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय साताऱयात सोहळ्याच्या तयारीला गती येणे शक्य नव्हते. मग यात बिनसले कुठे? नक्की काय घडले की, ज्यामुळे मोदी आता सातारला येणार नाहीत, अशा उलटसुलट चर्चा सुरू आहेत. एकंदरीत मोदींचा दौरा होणार नसल्याने नाराजीच्या तोफा वाजू लागल्या आहेत.


























































