
>> वैद्य सत्यव्रत नानल
केळी हे पूर्णान्न आहे. उत्तम पोषणाचा स्रोतही आहेच. पण आपण जी गोष्ट नेमकी लक्षात घेत नाही ती म्हणजे हे पोषण देणारे केळे आपण तेवढेच चांगले पचवू शकतो का? श्रेष्ठ पाचनशक्ती रोगनाशक असते. स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी पचन सुधारणे आवश्यक असते. नुसते चांगले पौष्टिक खाणे खाऊन काही होत नाही.
केळी म्हणजे गरीबांचे अन्न असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्रचंड मेहनत, पोषणाचा अभाव या गोष्टी गृहीत आहेत. जिथे काहीच खायला मिळत नाही तिथे केळी ही पूर्णान्नच ठरतात. पण सुखवस्तू घरातील लोक जे रोज एकवेळ नाश्ता आणि दोन वेळ जेवण करतात त्यांना अतिरिक्त पोषण आवश्यक आहे का हे आधी ठरवावे लागते. अतिरिक्त पोषण घेऊन ते पचवता न आल्याने स्वस्थ मनुष्य हळूहळू छोटय़ा मोठय़ा आजाराने ग्रस्त होतात. आज हे प्रमाण वाढलंय.
केळी कच्ची आणि पिकलेली अशी दोन्ही स्वरूपात खाल्ली जातात. कच्ची केळी तुरट असतात. यांची भाजी बनते, ती वजन वाढवण्यास उत्तम. तुरट असल्याने आतडय़ांची शक्तीसुद्धा चांगली वाढते. ज्यांना सूज येणे, रक्ताभिसरण बरोबर नसणे, सर्दी, डोकेदुखी असेल त्यांनी मात्र खाऊ नये. याने मळही बांधून होतो. बद्ध लोकांनीसुद्धा खाऊ नये. पिकलेली केळी प्रचंड गोड. केळी कशीही खाल्ली तरी पचायला थंड असतात. केळी पचली नाहीत तर त्यामुळे शरीरात कफ अगदी सहज बनतो आणि कफाचे सर्व रोगही. लहान-मोठे सर्वांवरच हा परिणाम दिसतो.
आजकाल लहान मुलांना केळी नियमित खायला देण्याचे सल्ले सर्रास दिले जातात. वयाच्या 12 ते 15 वर्षांपर्यंत कफाचे विविध रोग सहज होतात. त्यात केळी दिली की कफाचे रोग शरीरात स्थिरावतात आणि घेतलेल्या औषधांचे टिकाऊ परिणामही मिळत नाहीत. ‘बालदमा’ नावाने आजकाल सर्रास पंप वापरणारी चिमुरडी पाहिली की दुःख होते. या अवस्थेला ‘बालदमा’ न म्हणता आयुर्वेदात ‘अकार्यक्षम आणि अविकसित फुप्फुसे’, ‘उदान वैगुण्य’, ‘कफावृत उदान’, अशी विविध निदाने करून आम्ही वैद्य चिकित्सा देतो आणि उत्तम फायदेही होतात. पंप, स्प्रे वगैरे सुरू केले की आयुष्यभर त्यांची सवय लागते आणि त्या औषधांचे दुष्परिणामही भोगावे लागतात. अशा वेळी सर्दी, खोकला, ताप, येणाऱया मुलांना केळी, सीताफळ, पेरू, मिल्कशेक, आइस्क्रीम अशा गोष्टींपासून लांबच ठेवणे उत्तम ठरते.
लहान मुले असोत की मोठी माणसे किंवा स्त्र्ाया, नियमितपणे नुसती केळी खाणे असो किंवा दूध आणि केळे एकत्र करून नियमित खाल्ले तर त्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी, चरबीचे रोग, अवयवात चरबी साठणे (फॅटी लिव्हर), चरबीच्या विविध गाठी (चॉकलेट सिस्ट, पिसिओडी, टय़ुमर इत्यादी) बनणे, त्वचेचे रोग, अॅलर्जी, कुपोषित फुप्फुसे (रेसपायारेटरी इंस्फिशियंसी), लहान मुलांमध्ये मेंदूच्या विकासात अडथळे (डीलेड माईलस्टोन्स), डोळ्यांना चष्मा, पोटात जंत, मूत्रवह संस्थेचे विविध रोग, मधुमेह, अंगावर किंवा शरीरात विविध अवयवांना येणारी सूज (गॅसस्ट्रायटीस, बल्की युटरस, एंडोमेट्रीओसिस, वेगवेगळे आर्थ्रायटीस इत्यादी) असे अनेक त्रास होतात. शरीरात रक्ताभिसरण होण्यास अडथळे निर्माण होतात ज्याने अनेक रोग औषधे घेऊनही बरे होत नाहीत. हे आयुर्वेदाचे स्पष्ट मत आहे.
त्यामुळे केळी सतत, रोज खाऊच नयेत हे उत्तम. खाताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. वेलची केळे घेऊन त्यात साल न काढता लवंग खुपसून दुपारपर्यंत ठेवावी. दुपारी चार वाजता लवंगासह ते एक केळे एका वेळी खावे, त्यावर एक चमचा मध चघळून खावा. कडुलिंबाचा मध असेल तर सर्वात उत्तम. व्यायाम भरपूर करणाऱया व्यक्तींमधेसुद्धा भरपूर केळी खाण्याची प्रथा दिसते. त्यांच्यात सुद्धा वरील सांगितलेले अनेक रोग दिसतात. तसे असेल तर आपल्या वैद्याचा सल्लाही घ्यावा आणि केळी खाणेही थांबवावे किंवा पद्धती बदलाव्यात. पचत नसतील तर केळी आपल्यासाठी नाहीत असे समजून त्यांना रामराम करावा. आणि खायचा अट्टहास असेल तर भरपूर व्यायाम करून पचनशक्ती आधी वाढवावी.
दूध आणि केळे किंवा कोणतीही ताजी फळे एकत्र करून खाणे आयुर्वेदानुसार चूक. हे अनेक लोकांना ऐकून माहीत असते. परंतु पटत नसते. ‘त्यात काय, आम्ही शिकरण खाऊनच मोठे झालो. आम्हाला त्रास नाही झाला कधी.’ असे म्हणणारेही अनेक सापडतात. या वादाला उत्तर एकच- ‘पकडला गेला तो चोर.’ अशा अनुसार त्रास झाला की उशीर झालेला असतो हे लक्षात घ्यावे. म्हणजे त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतलेली कधीही उत्तमच.
दुधासह ताजी फळे, मीठ, आंबट पदार्थ, मांसाहार, मूग, पालेभाज्या, अक्रोड यापैकी काहीही घेऊ नये. अनेक रेसिपीजमधे असे अनेक पदार्थ वापरलेले दिसतात. म्हणून ते योग्य ठरत नाहीत. प्रत्येक पदार्थ जो बनतो त्याचे विशिष्ट परिणाम शरीरावर घडतात. आहाराने शरीर बनते तर बिघडतेही. या प्रकारेची सर्व मिश्रणे प्रचंड पोषक (हाय नरिशमेंट) देणारी असली तरी आपले यकृत यांना पचवण्यासाठी कार्यक्षम नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच अनेक रोग होण्याची, टिकण्याची आणि वाढण्याची शक्यता याप्रकारे आहार ठेवण्याने निर्माण होते.




























































