विश्वचषकासाठी ५ हजार किमीची सायकल सफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ दांडेकर | मुंबई

जगातील फुटबॉलवेडे आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. सौदी अरेबियाचा एक युवा फुटबॉलशौकीन फाहद अल याह्या चक्क सायकलने ५१४५ किमी अंतराचा प्रवास करीत मॉस्कोत पोचलाय. फाहदने यंदाच्या फिफा विश्वचषकातील रशिया विरुद्ध सौदी अरेबिया या सलामीच्या लढतीचा मनमुराद आनंदही घेतलाय. चार देशांचा प्रवास करून याह्याने ७५ दिवसांत मॉस्को सर केले. त्याची ही सफर अनेक संकटांनी भरलेली होती. या प्रवासात त्याच्या पाठदुखीने डोके वर काढले. एका देशात तर फाहदची टक्कर ट्रकशी झाली, पण सुदैवाने मोठी दुखापत न होता तो बचावला. सौदी अरेबियाचा राष्ट्रध्वज घेऊन मजल दरमजल करीत तो मॉस्कोला पोचला आणि रशियातील सौदी दूतावासाने त्याचे जंगी स्वागत केले.

२८ वर्षीय फाहदने सौदीची राजधानी रियाध येथून आपल्या विश्वचषकासाठीच्या आगळ्या सायकलसफरीला सुरुवात केली. सौदी राजपुत्र फैसल बेन बदाल अब्दुल्लाजीज यांनी सौदीचा राष्ट्रध्वज देऊन फाहदला मॉस्कोला रवाना केले. चार देश फिरून फाहद रशियाला पोचला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मॉस्कोत त्याचे स्वागत सौदी राजदूत रायेद करिमील यांनी केले, तर सेंट पिटर्सबर्ग येथे विश्वचषक लढतीस्थळी सौदी अरबी फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष एदेल अजात यांनी त्याची पाठ कौतुकाने थोपटली. आता फाहद आपल्या मॅरेथॉन सायकल सफरीनंतर विश्वचषकात आपल्या संघाला चिअर करतोय.

मेस्सीसाठी हिंदुस्थानी फ्रांसिसही सायकलने रशियात
हिंदुस्थानी फुटबॉल शौकिनांनीही खेळाच्या वेडेपणात आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.केरळच्या क्लीफिन फ्रान्सिस या फुटबॉलशौकीनने सायकलने ५०० किमी प्रवास करीत मॉस्को गाठले आहे. क्लीफिन अर्जेन्टाईन सुपरस्टार लिओनेल मेस्सीचा मोठा चाहता आहे. त्याने दुबईत सायकल खरेदी केली आणि बोटीने इराणपर्यंत प्रवास केला. इराणी बंदर अब्बास येथून फ्रांसिसने आपला सायकल प्रवास सुरू केला. आता तो रशियात पोचला असून विश्वचषकाच्या लढतींचा आनंद घेत आहे. मायदेशी हिंदुस्थानला परतताना आपला लाडका फुटबॉल सुपरस्टार मेस्सीची स्वाक्षरी सायकलवर घेण्याची त्याची इच्छा आहे. ही स्वाक्षरी घेतलेली सायकल तो जपून ठेवणार आहे.