सौरभ आणि त्याचे दोन मित्र देवदूत बनले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

सरगम सोसायटीतील बी विंगमधल्या अकराव्या मजल्यावर आग लागल्यामुळे भेदरलेल्या रहिवाशांनी तडक गच्चीकडे धाव घेतली. त्या वेळी त्याच इमारतीत राहणाऱ्या सौरभ लंके (20) याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्या मित्रांच्या मदतीने ए विंगमधून इमारतीत धाव घेतली आणि पंधराव्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांना शिडीच्या सहाय्याने बाजूच्या चौदाव्या मजल्यावरील गच्चीवर उतरवले. त्यामुळे गच्चीवर अडकलेल्या 22 जणांची सुटका झाली.

आग लागलेल्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावर बिकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा सौरभ आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. आपल्याच इमारतीत अकराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच क्लासमध्ये असलेल्या सौरभ याने तडक घर गाठले. गच्चीवर काही माणसे अडकली आहेत हे कळताच सौरभने त्याचे मित्र नितीन मोरे आणि बागा यांच्यासोबत बाजूच्या ए विंगमधून तडक गच्ची गाठली. बी विंग पंधरा मजल्याची असल्याने तेथे जाणे तसे अवघडच होते; परंतु हिंमत न हरता सौरभने मित्राच्या खांद्यावर चढत बी विंगचा पंधरावा मजला गाठला आणि त्या ठिकाणी शिडी लावून एकेक करून वर अडलेल्या रहिवाशांना दुसऱ्या गच्चीवर पाठवले.

उपचारानंतर अग्निशमन दलाच्या जवानासह दोघांना डिस्चार्ज
टिळकनगर येथील सरगम इमारतीला लागलेल्या आगीत श्रीनिवास जोशी हे जखमी झाले होते. तसेच आगीवर नियंत्रण आणत असताना अग्निशमन दलाचे जवान छगन सिंग यांनाही धुरामुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर  उपचार केल्यांनतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने दोघांनाही डिस्चार्ज दिल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतरांचे प्राण वाचवले, पण आईला वाचवू शकले नाहीत
विक्रोळी पोलीस ठाण्यात काम करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांना सायंकाळी आपल्या इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना खाली काढण्यासाठी अतोनात  प्रयत्न केले. परंतु बाराव्या मजल्यावर त्यांना पोहोचता आले नाही. बाराव्या मजल्यावर खोली क्रमांक 1201मध्ये अडकलेल्या जोशी यांच्या आई सुमन व वडील श्रीनिवास यांनी बाहेर पडण्यासाठी धाव घेतली. तेथून श्रीनिवास कसेबसे बाहेर पडले. त्यांच्या पत्नी सुमन यांना वार्धक्यामुळे तेथून निसटता आले नाही आणि धुरात गुदमरल्यामुळे त्यांचे प्राण गेले.

रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सुनीता जोशी, भालचंद्र जोशी, सुमान जोशी, लक्ष्मीबेन गांगर आणि सरला गांगर या पाचहीजणांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात ठेवले होते. सकाळी शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांबरोबरच सरगम सोसायटीतील रहिवाशांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होते. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होते.

भाजीसाठी गेली म्हणून सूनबाई वाचली
सरगम इमारतीच्या आकराव्या मजल्यावर राहणारे सुरेश गांगर आणि त्यांचा मुलगा मुंबई सेंट्रल येथे व्यवसाय करतात तर घरी आई, पत्नी आणि सून असतात. इमारतीला लागलेल्या आगीत त्यांनी आई लक्ष्मीबेनसह पत्नी सरला यांना गमावले आहे तर आग लागण्याआधी केवळ पाच मिनिटेच त्यांची सून भाजी आणण्यासाठी खाली गेल्या होती. त्यामुळेच ती बचावल्याचे गांगर यांच्या नातेवाईकांनी सांगितले.