कुलगुरूंच्या खुर्चीवर ‘रॅपर’! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणाचे माहेरघर असे बिरूद मिरवणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ज्या ठिकाणी अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग झाले. ज्या खुर्चीवर कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलावर दारूची बाटली आणि शस्त्र ठेवून रॅपर शुभम जाधवने रॅप साँग म्हटले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. शुभम जाधवविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अद्याप कारवाई केलेली नाही. दरम्यान, रॅप साँगसाठी विद्यापीठातील ज्या कर्मचाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

रॅप साँगमध्ये अश्लील भाषेचा वापर केला आहे. धक्कादायक म्हणजे रॅपर शुभम जाधवला विद्यापीठातील अधिसभा भरते तेथे जाण्यास परवानगी कोणी दिली? दारूची बाटली, शस्त्र घेऊन रॅपर जाधव तेथे गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावेळी विद्यापीठातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱयांनी त्याला का अडवले नाही? आदी गंभीर प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

रॅप सॉंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची  चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, प्रतिष्ठत निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे (सदस्य सचिव) आदींचा समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समितीला दिले.

विद्यापीठातील प्रकार निंदनीय – वरुण सरदेसाई

रॅप साँगमध्ये वापरलेली भाषा आणि त्यात वापरण्यात आलेली साधनं ही विद्यापीठाच्या परिसरात वापरणे हा अत्यंत भयानक प्रकार आहे. आम्ही पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्ते जेव्हा या विद्यापीठाच्या परिसरात येतो तेव्हा सगळ्यांची चौकशी सुरक्षारक्षकांकडून केली जाते आणि कमीत कमी पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जातो, असे असताना जर विद्यापीठात शूटिंग, अश्लील भाषा वापरून रॅप गाणे तयार केले जात असेल आणि तलवारी काढल्या जात असतील तर यावर कारवाई झाली पाहिजे. हा सगळा प्रकार निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केली.