‘निर्भया’ प्रकरणी आरोपींची फाशी कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

अवघा देश हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपींची दयायाचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता आरोपींना राष्ट्रपतींकडे दयायाचिका करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपींना दिलेला फाशीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०१७ ला शिक्कामोर्तब केले होते. यातील पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या तीन आरोपींनी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. चौथा आरोपी अक्षय ठाकूरने पुनर्विचार याचिका सादर केली नव्हती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. यावेळी न्यायालयात निर्भयाचे कुटुंबीय उपस्थित होते.

आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले, मात्र न्याय मिळण्यास उशीर होत आहे. पाचही आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकविले पाहिजे. त्यातील एक अल्पवयीन आरोपी बाहेर आहे त्यालाही फाशी द्यावी अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे.

काय आहे प्रकरण?

 १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय निर्भयावर चालत्या बसमध्ये सहाजणांनी बलात्कार करून तिला मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले. आरोपींमध्ये एक १७ वर्षांचा अल्पवयीनही होता.
 २९ डिसेंबर २०१२ ला निर्भयाचा सिंगापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 या भयंकर घटनेचे पडसाद दिल्लीसह देशभर उमटले. तत्कालीन यूपीए सरकारने महिला अत्याचाराविरुद्ध कायदा कडक केला.
 मुख्य आरोपी राम सिंहने तिहार कारागृहात आत्महत्या केली.
 विशेष न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा १३ मार्च २०१४ ला दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवली. 
५ मे २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.