शालेय शुल्क न भरल्याने दुसरीच्या विद्यार्थ्याला कार्यालयात डांबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । उदगीर

उदगीर येथील इंग्रजी माध्यमात इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शालेय शुल्कासाठी शाळेच्या कार्यालयातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १८ हजार रुपयांच्या थकीत शुल्कासाठी हा प्रकार केल्याने शिक्षक, संस्थाचालक यांच्यासह इतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहरातील उदय कॉलनी परिसरात लिटल इंग्लिश नावाची शाळा आहे. या शाळेत ७ वर्षाचा मुलगा शिक्षण घेत आहे. शुक्रवारी मुलगा शाळेच्या वाहनातून शाळेत गेला होता. मात्र, दुपारी शाळा सुटल्यानंतरही तो परत आला नसल्याने वडिलांनी वाहनधारकाकडे विचारणा करून शोध घेत थेट शाळा गाठली. त्यावेळी शाळेच्या कार्यालयातच तो रडत बसलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावर त्यांनी विचारणा केली असता, थकीत असलेल्या १८ हजार रुपयांच्या शिक्षण शुल्कासाठी बालकास थांबवून ठेवल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्याच्या पालकाने शनिवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलिसांत शिक्षिका आशा ममदापूरे, संस्थापक राजकुमार ममदापूरे व सरअराज शेख या तिघांविरोधात शालेय शुल्कासाठी मुलाला शाळेत अडकावून ठवेल्याची तक्रार नोंद केली आहे. त्यानुसार बालन्याय अधिनियमन २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ मुलाणी हे तपास करत आहेत.