
आपल्या हाताखाली काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अपशब्द बोलल्यामुळे एका ‘बॉस’ला 19 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना स्कॉटलंड येथे घडली आहे. येथे शहजाद युनूस नावाच्या माणसाची एक कंपनी होती. त्याच्या कंपनीत आयेशा जमान नावाची महिला काम करत होती. पण, युनूसने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तो तिच्या शारीरिक ठेवणीवरून टोमणे मारत जाडी म्हणत असे. तसंच, आपल्याला या कार्यालयात सडपातळ आणि चुणचुणीत तरुणी हव्यात, असंही तो तिला सांगत असे.
कंपनीचं काम आटोपून आयशा रात्रीच्या वेळी डीजेचं काम करत होती. युनूसने तिच्या त्या नोकरीवरही भाष्य केलं होतं. डिस्को जॉकीचं काम हे वेश्यांचं काम आहे अशा शब्दात त्याने तिच्या कामाचा अपमान केला होता. तसंच, तो तिला फोनवर अश्लील फोटो पाठवत असे. एकदा त्याने तिला बलात्काराची धमकीही दिली होती.
अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून आयेशाने कोर्टात धाव घेतली. तिथे तिने युनूसविरुद्धचे सगळे पुरावे सादर केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानतंर कोर्टाने आयशा हिच्या छळवणुकीसाठी युनूस आणि त्याच्या कंपनीला दोषी मानलं. आणि त्याला 19 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
पण, हा निकाल लागताच युनूसने आपली कंपनी विकली आणि तो पाकिस्तानात पळून गेला. आयेशाला अद्याप तिची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पोलिसांकडे सदर पैसे वसूल करण्यासाठी खूप कमी पर्याय शिल्लक आहेत. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत आयेशाचे स्वतःचे 10 लाख रुपये खर्च झाले आहेत. सध्या युनूस फरार असून तो पाकिस्तान आणि बुडापेस्ट इथून आपला व्यवसाय चालवतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.






















































