अमृतसरच्या सुवर्ण मंदिरानजीक 24 तासांत दुसरा स्फोट, बॉम्बशोधक पथक दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमृतसरच्या प्रसिद्ध हरमंदिर साहब गुरुद्वारा अर्थात सुवर्ण मंदिरानजीक 24 तासांच्या आत दोन स्फोट झाले आहेत. पहिला स्फोट रविवारी झाला असून सोमवारी सकाळी दुसरा स्फोट झाला आहे. रविवारी झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाले होते. सोमवारी त्याच जागी दुसरा स्फोट झाला.

हा स्फोट एका हॉटेलच्या चिमणीचा असल्याची माहिती मिळत आहे. अजून मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली असून बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमाराला हा स्फोट झाला. त्यानंतर या परिसरातील गटारे, झाडे-झुडुपांचा प्रदेश इत्यादींमध्ये शोध घेण्यात येत आहे. या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली असून कसून शोध घेतला जात आहे.

रविवारी याच जागी एक स्फोट झाला होता. त्यात 6 जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण, तो स्फोट हल्ला नसून अपघात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. स्फोटामुळे परिसरातील इमारतीच्या काचा फुटून लोक जखमी झाले होते.