
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम चालवणाऱ्या सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. गांदरबल येथील दाट जंगलात दहशतवाद्यांनी लपण्यासाठी बनवलेला एक अड्डा राज्य पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी उद्ध्वस्त केला आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादी लपण्यासाठी आणि आश्रयासाठी या तळाचा वापर करत होते.
सुरक्षा दलाला दहशतवाद्यांच्या अड्ड्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने गांदरबलच्या जंगलात शोध मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाला दहशतवाद्यांचा तळ सापडला. सुरक्षा दलाने हा तळ उद्ध्वस्त केला आहे. तसेच घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या जंगलात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. कश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊट मोहीमेला गती दिली आहे. सुरक्षा दलाने रविवारी शोपियाँ जिल्ह्यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून गेल्या चार दिवसात सुरक्षा दलाने 15 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे.























































