पारनेरमध्ये जप्त केलेली वाहने कंपनीतून पळवली

445

गौण खनिजाची चोरीप्रकरणी जापनीज हबमध्ये ताब्यात घेण्यात आलेले दोन जेसीबी व एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून मध्यरात्री कारवाई सुरू असतानाच पळवून नेण्यात आले. तर एक पोकलेन पळवून नेण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला. मायडीया, कॅरीअर व मिंडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन व ईसीआर या बांधकाम कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांनी गौण खनिजाचा पुरवठा करण्याचा करार स्थानिक ठेकेदारांशी केला आहे. या कंपन्यांनी सुरज व ईसीआर यांना उभारणीचे काम देताना केंद्र तसेच राज्य शासनाच्या परवानग्या, शासनाचे कर, स्वामीत्व धन सबंधितांनी जमा करण्याचा करार केलेला आहे.

ठेकेदाराने नेमलेल्या उपठेकेदारांनी जवळच्या गावांमधील शासकिय तसेच खाजगी जमीनींमधून मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून ते कंपन्यांना दिले. वाळू, खडी, सॅन्ड क्रशचा जो पुरवठा करण्यात आलेला आहे, त्याचेही स्वामीत्व धन शासनाकडे जमा करण्यात आलेले नसल्याचे कारवाईत उघड झाले. त्याच्या नोंदवह्या एकाही कंपनीमध्ये आढळून आल्या नाहीत. तहसिलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने कारवाई केली. तिन्ही कंपन्यांमध्ये मोठया प्रमाणात गौण खनीज आढळून आल्याने रात्रभर कारवाई सुरूच होती. पथक जेवणासाठी गेल्यावर ईसीआर कंपनीच्या ठेकेदाराकडील दोन जेसीबी मशीन तसेच एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून पळवून नेण्यात आले. याप्रकरणी तहसिलदार देवरे यांनी सुपे पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांना अहवाल पाठविला असून सबंधितांची वाहने महसूल विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

पथकाची कारवाई सुरू असताना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास विपुल सावंत हा गौणखनिज तस्कर मींडा कंपनीमध्ये पोहचला. तेथून पोकलेन पळवून नेण्याचा सावंतचा प्रयत्न होता. मात्र, पथकाने त्याला मज्जाव केल्याने तो फसला. रात्रीपासून ताब्यात घेण्यात आलेली यांत्रिक उपकरणे, वाहने तहसिल कार्यालयात आणण्यात येत होती. रविवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया मात्र अपूर्णच होती. नादुरूस्त वाहने ताबा पावती करण्यात येउन कंपनी व्यवस्थापनाकडे स्थानबद्ध करण्यात आल्याचे तहसिलदार देवरे यांनी सांगितले. कारवाईमध्ये तहसिलदार ज्योती देवरे यांच्यासह 20 कर्मचारी सहभागी झाले होते. दुपारी सुरू झालेली कारवाई रविवारी पहाटेपर्यंत तब्बल 28 तास सलग सुरू होती. ताब्यात घेण्यात आलेली वाहने तहसिल कार्यालयात जमा करण्याचे काम रविवारी दिवसभर सुरूच होते.

आपली प्रतिक्रिया द्या