मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी श्रेया जाधवची निवड, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेक्सिको (नॉर्थ अमेरिका) येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या श्रेया जाधव हिची हिंदुस्थानी संघामध्ये निवड झाली आहे. श्रेया रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून बीकेएस अकादमीमध्ये दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भास्कर कारकेरा आणि सिद्धेश घाग यांच्या मार्गदर्शनाखाली ती या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.

नाशिक येथे झालेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्पर्धेमध्ये श्रेयाने सुवर्णपदक मिळविले होते तसेच औरंगाबादमध्ये सिनियर ओपन नॅशनल तायक्वांदो चाचणीतही श्रेयाने सुवर्णपदक मिळविले होते. सध्या श्रेया ऑल इंडिया रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तसेच तिची पंजाब-अमृतसर येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्येसुद्धा मुंबई विद्यापीठातून निवड झाली आहे.

इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष्य नामदेव शिरगावकर, तायक्वांदो अससोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे यांच्या सहकार्याने श्रेयाने हिंदुस्थानी संघात स्थान मिळवले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची ही कन्या आता मेक्सिको येथे 13 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत तिरंगा फडकविण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत आहे.