
सामना ऑनलाईन । मोरबी
भाजपचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी तात्काळ पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये चोरीमारीच्या वाढलेल्या घटना, तसे हत्येच्या प्रकरणांमुळे गुजरातमध्ये गुंडाराज असल्यासारखे वातावरण तयार होत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.
जयंती भानुशाली हे सयाजी नगरी ट्रेनमधून भुजहून अहमदाबादकडे निघाले होते. मालियाजवळ काही गुंड एसी कोचमध्ये शिरले त्यांनी भानुशाली यांच्यावर गोळीबार केला. भानुशाली यांना दोन गोळ्या लागल्या. एक गोळी डोळ्यात, तर दुसरी डोक्यात मारण्यात आली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी लगेचच तिथून पळ काढला.
भानुशाली यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी मोरबी पोलिसांना दिली. त्यांनी भानुशाली यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला आहे.
दरम्यान, जयंती भानुशाली यांच्यावर एका महिलेने गेल्यावर्षी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी राज्य भाजप अध्यक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांनी या तक्रारदार महिलेने याप्रकरणात आणखी तपास करू नये अशी विनंती केली. पण थोड्याच दिवसात भानुशाली यांचा महिलेशी गैरवर्तन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे बरीच टीका झाली होती.





















































