
मेधा पालकर
वेद आणि संस्कृतचे ज्येष्ठ विद्वान म्हणून ओळख असलेल्या प्रा. डॉ. गणेश थिटे यांना प्रतिष्ठेचा पुरुषोत्तम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कै. जयंती वासुदेव विश्वस्त निधी या सांगलीमधील संस्थेतर्फे संस्कृत भाषेसंदर्भात अध्यापन व संशोधन करणाऱया विद्वानांचा सत्कार या पुरस्काराने केला जातो. पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे माजी प्रमुख म्हणून डॉ. थिटे यांनी काम पाहिले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील महाभारत प्रकल्पाचे प्रमुख, त्या संस्थेचे माजी क्युरेटर आणि अनल्स या संशोधन नियतकालिकाचे माजी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे अनेक ग्रंथ, अनुवादित ग्रंथ, निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ आतापर्यंत अमेरिका आणि फ्रान्स येथे दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले.
1974-2004 या कालावधीसाठी पुणे विद्यापीठाच्या संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागातील पदव्युत्तर वर्ग त्यांनी घेतले आणि पीएच.डी. च्या 15 विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागाचे प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठात 2004 मध्ये प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. जर्मन, फ्रेंच, संस्कृत, पाली, हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी आतापर्यंत ब्राह्मण ग्रंथातील त्याग, औषधः वैदिक आणि नंतरचे त्याचे जादूई-धार्मिक पैलू साहित्य, म्युझिक इन द वेदः इट्स मॅजिक-रिलिजियस महत्त्व,आपस्तंब-श्रौतसूत्रः नोट्ससह इंग्रजी अनुवाद, कात्यायन-श्रौतसूत्र ः नोट्ससह इंग्रजी अनुवाद, हिस्ट्री ऑफ संस्कृत फिलॉलॉजी आणि इंडियन पुरातत्त्वशास्त्र्ा (जर्मनमधून इंग्रजीत अनुवादित) अशा हिंदुस्थानी आणि परदेशी जर्नल्समध्ये 250 हून अधिक शोधनिबंध त्यांचे प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत स्वित्झर्लंड, जर्मनी, नेदरलँड्स, यूएसए, फ्रान्स, रोमानिया, इटली आदी देशांना भेट दिली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (2004), महर्षी संदीपानी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक पारितोषिक (2004), पहिली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती (1960), बर्कले युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया, यूएसए (2016) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे.


























































