लाखो मराठी तरुणांना रोजगार देणारा ‘भला माणूस’ हरपला, शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे सहकारी शिवसेना नेते सुधीरभाऊ जोशी यांचे जसलोक रुग्णालयात आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 81 वर्षे होते. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे आधारवड असलेले सुधीर जोशी यांच्या निधनाने लाखो मराठी तरुणांना रोजगार देणारा भला माणूस हरपला, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांसह सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. सुधीर जोशी यांच्या पश्चात भाऊ अरविंद, मुलगा प्रेषित, सून प्रणोती आणि नातवंडे असा परिवार आहे.

शिवसेना नेते सुधीर जोशी यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी शनिवार 12 फेबुवारी रोजी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी वीस दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते घरी परतल्यानंतर दहा दिवसांनी त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. गुरुवारी सायंकाळी 4.25 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

संगीत, क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या ‘आपुलकी’ या मोठय़ा गुणामुळे गुणीजनांत आणि समाजात अतिशय लोकप्रिय होते. सुधीर जोशी यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय पदे भूषविली. अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, अध्यक्ष/विश्वस्त – साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय, कार्यकारी समिती सदस्य – गरवारे क्लब, सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना. विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान, विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट, अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, अध्यक्ष – इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना, अध्यक्ष-क@नरा बँक कर्मचारी सेना, अध्यक्ष-महाराष्ट्र दूध वितरक सेना, अध्यक्ष-विमा कर्मचारी सेना अशा विविध पदांवर ते कार्यरत राहिले.

शिवसेनेच्या आंदोलनांतील तळपती तलवार गमावली – खासदार संजय राऊत

मुंबईची प्रतिमा कशी असावी हे आम्ही सुधीर जोशी यांच्याकडून शिकलो. शिवाय महापौर कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुधीर जोशी होते. ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले. सीमालढय़ासाठीही त्यांनी अनेक आंदोलने केली. राज्याचे महसूल आणि शिक्षणमंत्री म्हणून सुधीर जोशी यांनी काम केले. अपघातामुळे राजकारणापासून दूर असले तरी शिवसेनेसोबत त्यांचे नाते कायम होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेने एक अनमोल हिरा आणि आंदोलनातील तळपती तलवार गमावली आहे. त्यांची आम्हाला कायम उणीव भासेल, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुधीर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.

सुधीर जोशी यांच्या मार्गदर्शनाची उणीव भासेल – सुभाष देसाई

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. शिवसेनेला जनमानसात पोचवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. मराठी माणसाच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या मार्गदर्शनाची कायमच उणीव भासेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुŠख पेलण्याचे बळ देवो, अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.

सुधीरभाऊंचे कार्य पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली! ‘लोकाधिकार’ महासंघाने व्यक्त केल्या भावना

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनेही भावना व्यक्त करण्यात आल्या. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील नेते आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष सुधीरभाऊ जोशी यांच्या निधनामुळे शिवसेना आणि लोकाधिकार महासंघात पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना आणि लोकाधिकार महासंघाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.’ असे महासंघाच्या वतीने शिवसेना नेते, खासदार व महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते, महासंघाचे कार्याध्यक्ष व माजी खासदार आनंदराव अडसुळ, शिवसेना सचिव, महासंघाचे सरचिटणीस व खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेचा सुसंस्कृत, आक्रमक चेहरा काळाच्या पडद्याआड – महापौर किशोरी पेडणेकर

शिवसेनेचा सुसंस्कृत, आक्रमक चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले व स्थानीय लोकाधिकार समितीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे शिवसेना नेते सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी होते. सुधीर जोशी शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. लोकाधिकार समितीच्या बैठकीत त्यांच्या नेतृत्वगुणाची चमक पाहायला मिळत होती. युतीच्या सरकारमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे महसूल व शिक्षणमंत्री पद भूषविले होते, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

आज अंत्यसंस्कार

सुधीर जोशी यांचे पार्थिव उद्या शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत दादर येथील हरिश्चंद्र येलवे मार्गावरील मुंबई महापालिका जी-उत्तर वॉर्ड कार्यालयासमोरील पारिजात इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसेनाप्रमुखांचे शिलेदार

शिवसेना नेते सुधीर गजानन जोशी यांचा जन्म 25 मे 1940 रोजी दादर येथील एका व्यापारी कुटुंबात झाला. माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्रात विज्ञान शाखेची पदवी घेतली. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुखांच्या सहकारी नेत्यांपैकी ते एक होते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने पुकारलेल्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रणी होते. सुशिक्षित व सुसंस्कृत कार्यकर्त्यांची फौजच त्यांनी शिवसेनेत उभी केली. सरकारी आणि खासगी आस्थापनांमधील नोकऱयांमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढलाच पाहिजे यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतून स्थानीय लोकाधिकार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी सुधीर जोशी यांच्यावर सोपविली होती. 1977 पासून सलग 20 वर्षे ते स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष होते. 1997 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

सर्वात तरुण महापौर

सुधीर जोशी हे 1968 साली मुंबई महानगरपालिकेत प्रथम नगरसेवक झाले. गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी महापालिका सभागृहात सर्वसामान्यांसाठी आवाज उठवला. 1973 मध्ये ते वयाच्या 33 व्या वषीं मुंबईचे महापौर झाले. ते सर्वांत तरुण महापौर होते. शिवसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीने त्या निवडणुकीत बहुमत मिळवले होते. 1974 पर्यंत ते महापौरपदावर राहिले. स्थायी समिती अध्यक्ष, बाजार व उद्यान समिती सदस्य, शहर नियोजन समिती सदस्य आदी पदेही त्यांनी भूषविली.

आमदार ते मंत्री

1986 मध्ये सुधीर जोशी यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. 1992-93 दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. शिवशाही सरकारमध्ये त्यांनी महसूल आणि शिक्षणमंत्री पद भूषवले. अपघातामुळे काही काळ त्यांना राजकारणापासून दूर राहावे लागले होते. 1996 मध्ये झालेल्या अपघातानंतर जुलै 1999 पर्यंत ते शिक्षणमंत्री होते, मात्र त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.

लढवय्या नेता हरपला; राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून सुधीर जोशी यांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.