ईडीपाठोपाठ सीबीआयला झटका; कुंदन शिंदे यांची तुरुंगातून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे तत्कालिन स्वीय सचिव कुंदन शिंदे हे एक वर्ष सात महिन्यांनंतर शुक्रवारी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणात केंद्रीय यंत्रणांच्या तपासातील विसंगतींवर बोट ठेवत सत्र न्यायालयाने ईडीपाठोपाठ सीबीआयच्या प्रकरणात कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर केला.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी कुंदन शिंदे यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून शिंदे यांची शुक्रवारी सायंकाळी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. न्यायालयात कुंदन शिंदे यांच्यातर्फे ऍड. इंद्रपाल सिंह, ऍड. अनिकेत निकम, ऍड. अभिषेक मोरे यांनी बाजू मांडली. शिंदे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना पुढील महिनाभर प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत सीबीआयच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.