
हिंदुस्थानचे बॉक्सर जागतिक युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहेत. सात महिलांसह आठ बॉक्सर अंतिम फेरीत दाखल झाले असून तीन खेळाडूंनी कास्यपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानची ही आतापर्यंतची सरस कामगिरी ठरणार आहे. याआधी 2018 मध्ये हंगेरीमधील जागतिक स्पर्धेत हिंदुस्थानी बॉक्सर्सनी 10 पदकांची कमाई केली होती.
आशियाई विजेती बेबीरोजिसानाकडून अपेक्षा
आशियाई विजेती बेबीरोजिसाना चानू हिने इटलीच्या एलेना अयारी हिचा पाडाव करून अंतिम फेरी गाठली. आता तिची गाठ रशियाच्या वेलेरिया लिंकोवा हिच्याशी पडणार आहे. पूनमने उझबेकिस्तानच्या सिटोरा हिचा 5-0 फरकाने धुव्वा उडवला. अंतिम फेरीत तिला फ्रान्सच्या स्टेलिन ग्रॉसीचे आव्हान असेल. सनमाचू चानूने उपांत्य फेरीत पोलंडच्या डारिया परादा हिचा 4-1 गुण फरकाने पराभव करून आगेकूच केली, तर अल्फियाने पोलंडच्या ओलिविया टेबोरेकच्या चुरशीच्या लढतीत 3-2 असा पराभव करून आगेकूच केली. अंतिम फेरीत तिची गाठ मोलदोवाच्या दारिया कोजोरेज हिच्याशी पडेल.
सचिन वगळता इतरांकडून निराशा
सायंकाळच्या सत्रात पुरुष गटात विजय मिळविणारा सचिन हा एकमेव हिंदुस्थानी बॉक्सर ठरला. त्याने इटलीच्या मायकल बालदासीचा पराभव केला. आता अंतिम फेरीत शुक्रवारी त्याच्यापुढे कझाकिस्तानच्या येरबोलात सेबिरचे आव्हान असेल. अंकित नरवाल (64 किलो), विश्वामित्र चोंगथोम (49 किलो) व विशाल गुप्ता (91 किलो) यांना उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंकितला कझाकिस्तानच्या साबिरजान अकालिकोवकडून, तर विश्वामित्रला कझाकिस्तानच्याच संजार ताशकेकडून 1-4 असा समान गुणफरकाने हार पत्करावी लागली. विशालला यजमान पोलंडच्या याकूब स्ट्राजेवस्कीने 5-0 फरकाने हरवले.
गीतिकाची अंतिम लढत नतालियाशी
गीतिकाने उपांत्य फेरीत इटलीच्या एरिका प्रिस्कियनडारो हिचा 5-0 गुणफरकाने धुव्वा उडवला. आता सुवर्णपदकाच्या लढतीत तिची गाठ पोलंडच्या नतालिया डोमिनिका हिच्याशी पडेल. विंकाने झेक प्रजासत्ताकच्या वेरोनिका गजदोवा हिचा 4-1 फरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता तिच्यापुढे कझाकिस्तानच्या झुलडीज शायखामेतोवा हिचे आव्हान असेल. अरुंधतीने उपांत्य लढतीत उझबेकिस्तानच्या खादीचोबानू अब्दुल्लाएवा हिच्यावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता जेतेपदाच्या लढतीत अरुंधती यजमान पोलंडच्या बारबरा मार्पिन्कोव्स्की हिच्याशी भिडेल.


























































