चार दिवसांत बेस्टचे सात लाख प्रवासी वाढले

69

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्टच्या स्वस्त आणि मस्त प्रवासाला भरघोस प्रतिसाद लाभत असून बेस्टचे पासधारकही 14 हजारांनी वाढले आहेत. तसेच चार दिवसांत बेस्ट प्रवाशांच्या संख्येत सात लाखांनी वाढ झाली आहे. बेस्टने 9 जुलैपासून दरकपात केल्याने साध्या बसचे किमान तिकीट पाच रुपये तर एसी बसचे सहा रुपये तिकीट झाल्याने प्रवाशांची झुंबड उडत असून शेअर टॅक्सी आणि रिक्षांचे वांदे झाले आहेत.

बेस्टने तिकीट दरात कपात करतानाच मासिक व त्रैमासिक पासांच्या दरातही कपात केली आहे. पूर्वी चार किलोमीटरपर्यंत बसचा पास हा 400 रुपयांपेक्षा जास्त होता. त्यामुळे प्रवाशांना बसचा पास परवडत नव्हता. तरीही 3 लाख 15 हजार पासधारक होते. बेस्टने पासचे दरही कमी केल्याने बस पास व विद्यार्थी बसपासाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. बसपास दरांसाठीही 5 किमी, 10 किमी, 15 किमी व 15 पेक्षा अधिक असे टप्पे ठेवल्याने अंतर जास्त व पासांचे दर घटल्याने त्यात 9 ते 12 जुलैपर्यंत बसधारकांच्या संख्येत 14 हजारांनी वाढ झाल्याचे बेस्टमधील सूत्रांनी सांगितले. 11 जुलै रोजी 3 लाख 27 हजार 34 प्रवाशांनी बसपास काढले व 12 जुलै रोजी हीच वाढ 3 लाख 29 हजार 778 पर्यंत पोहोचली आहे.

 बेस्टने दरकपात करताच 9 जुलैपासून बेस्टचे प्रवासी वाढू लागले आहेत. तीन दिवसांत 11 जुलैच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 7 लाख 20 हजार 743 ने प्रवासी संख्येत भर पडली आहे. तर 54 लाख 77 हजार 611 रुपयांनी उत्पन्न घटले आहे. तर 24 लाख 36 हजार 183 तिकिटांची विक्री झाल्याचे बेस्टने जाहीर केले आहे.

 

नवीन बसपास दर रुपयांमध्ये

कि.मी.      मासिक त्रैमासिक मासिक (एसी) त्रैमासिक (एसी)

5                   250       750          300               900

10                 500     1,500         650              1,950

15                 750     2,250         950              2,850

15 पेक्षा अधिक 1,000  3,000       1,250            3,750

आपली प्रतिक्रिया द्या