
शेतकऱ्यांना कर्जमुक्त कारण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती जाहीर केली. मात्र किचकट नियमामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्यापासून लांबच राहत आहे. फार्मर आयडी आणि ई-केवायसी केली नसल्याने शहापूर तालुक्यातील साडेचार हजार शेतकरी कर्जमाफीस मुकणार आहेत. शासनाच्या तांत्रिक चुकांचा फटका बळीराजाला बसत असल्याने संताप व्यक्त होता आहे.
शहापूर तालुक्यात ३४ हजार ७०४ खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ३० हजार २२८ शेतकऱ्यांनी अॅग्रोस्टॅकची नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र तरीही ४ हजार ४७६ शेतकरी अजूनही या नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबरोबरच बँकेतील कर्ज खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करून घावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्याने होणार असून संबंधित बँका आणि शासनाच्या यंत्रणांकडून पात्र कर्ज खात्यांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर माहितीची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. दरम्यान कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी शहापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वनपट्टेधारक तसेच शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामविकास अधिकारी कॅम्प घेणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी दिली.
बँकेतील नोंदी अचूक हव्यात
कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन कृषी कर्जाची रक्कम, खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक या नोंदी अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. याशिवाय सातबारा उतारा आवश्यकतेनुसार आठ-अ उतारा, ॲग्रोस्टॅकची नोंदणीची माहिती, ई-केवायसी पूर्ण होणे गरजेचे आहे.




























































