
सीमाप्रश्न पेटला आहे. कन्नडीगांकडून सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये दहशत पसरवली जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱयांनाच सरकारचे मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे नेते धमक्या देत आहेत. ‘सीमाप्रश्नी तोंड बंद ठेवा, नाहीतर पुन्हा तुरुंगात जाल’, अशी उघडउघड धमकीच मंत्री शंभुराज देसाई आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांना आज दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असतानाही शिंदे-फडणवीस सरकार सीमाप्रश्नावर मूग गिळून बसले आहे. ते षंढ, नामर्द आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली. त्यावर शंभुराज देसाई आणि बावनकुळे यांनी संजय राऊत यांना ही धमकी दिली. ‘संजय राऊत यांनी तोंड आवरावे, नाहीतर त्यांना पुन्हा तुरुंगात आराम करायला जावे लागेल. साडेतीन महिने आराम करून आल्यामुळे त्यांना बाहेरचे वातावरण सूट होत नाही आहे’, असे शंभुराज देसाई म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना धमकी दिली. ‘खासदार संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल.’, असे बावनकुळे म्हणाले. ‘मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल.’ असेही ते पुढे म्हणाले.
मी तयार आहे
संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करून या दोघांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मंत्रिमहोदय, ही सरळ सरळ धमकी समजायची काय?’ असा सवाल त्यांनी शंभुराज देसाई यांना केला आहे. तसेच ‘महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील हाच अर्थ…’ असेही राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सीमाप्रश्नावर सत्य बोलणाऱया, प्रश्न विचारणाऱयांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा…’ अशा शब्दांतही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
‘शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमावादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा, न्यायालये, तपासयंत्रणा खिशात आहेत, असेच शंभुराजे देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे…!’, असेही संजय राऊत यांनी ट्विटरवर ठणकावून सांगितले आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाला टॅग केले आहे.
‘कायदा, न्यायालये, तपास यंत्रणा खिशात आहेत, असेच शंभुराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे…!’




























































