‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

‘ब्रेक द चेन’बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी गृह (विशेष), प्रधान सचिव विनीत अग्रवाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगळ उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, संचारबंदी व जमावबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व व्यक्ती यांना या प्रक्रियेबाबत सहकार्य करण्याबाबतची विनंती करण्यात यावी. याउपरही विरोध होत असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही देसाई यांनी यावेळी दिले.

येत्या काळात रमझान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गुढीपाडवा हे सण साजरे करत असताना शासन आदेशाचे पालन करण्यात यावे. तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला यशस्वीपणे पायबंद घालण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी, शासन आदेशात नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही देसाई यांनी केले.

कोकणचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिगावकर, संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेडचे निसार तांबोळी, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावतीचे सि. के. मिना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या