मुंबईचा बडोद्यावर 309 धावांनी विजय

213

युवा स्टार फलंदाज पृथ्वी शॉची 202 धावांची संस्मरणीय द्विशतकी खेळी आणि त्याला मिळालेली कर्णधार सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज दीडशतक याच्या बळावर बुधवारीच माजी विजेत्या मुंबईने बडोदे संघावरील आपल्या मोठय़ा विजयाचे संकेत दिले होते. गुरुवारी शम्स मुलानीने आपल्या प्रभावी गोलंदाजीचा धडाका दाखवत यजमान बडोदे संघाच्या दुसऱ्या डावाला खिंडार पाडले. विजयासाठीचे 534 धावांचे आव्हान बडोद्याला पेलवले नाही. त्यांचा दुसरा डाव 224 धावांतच गडगडला. त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेच्या सलामीलाच खडूस मुंबई संघाने चौथ्या दिवशी 309 धावांचा ग्रॅण्ड विजय मिळवत यंदाची बोहनी सुरेख केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने आक्रमक खेळाच्या जोरावर 431 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल बडोद्याने 307 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून शम्स मुलानीने 6 बळी घेत बडोद्याच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले बडोद्याकडून केदार जाधवने नाबाद 160 धावा केल्या. दुसऱ्या डावातही मुंबईने सामन्यावर आपले वर्चस्व कायम राखत भक्कम आघाडी घेतली. पृथ्वी शॉने द्विशतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने 160 धावा केल्या.pruthvi

विजयासाठी 534 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बडोद्याची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसअखेरीस बडोद्याचे 3 गडी माघारी परतले होते. अखेरच्या दिवशी बडोद्याकडून अभिमन्यूसिंह राजपूत आणि दीपक हुडा यांनी अर्धशतकी खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आपला भेदक मारा सुरू ठेवत बडोद्याची झुंज मोडून काढली. शम्स मुलानीने दुसऱ्या डावात 4 तर शशांक अत्राडे-अक्ष पारकरने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तुषार देशपांडेने 1 बळी घेतला. सामन्यात 10 बळी आणि 89 धावा करणाऱ्या अष्टपैलू शम्स मुलानीला ‘सामनावीरा’चा किताब देऊन गौरविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या