शनि मंदिर अखेर सरकारच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।

महाराष्ट्रासह देश-विदेशातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर जिह्यातील शनि शिंगणापूर देवस्थान राज्य सरकारने अखेर ताब्यात घेतले आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंजूर झाले. या विधेयकामुळे शनैश्वर देवस्थानावर आता राज्य सरकारचे नियंत्रण राहील.

शिंगणापूर येथील शनैश्वर मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनानंतर अनेक भक्त शनि शिंगणापूरला आवर्जून जातात. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या कारभारात उत्तम व्यवस्थापन व प्रशासन आणण्याबरोबरच चांगल्या दर्जाच्या सोयी पुरवण्यासाठी राज्य सरकारने हे विधेयक आणले. शनैश्वर मंदिराच्या काराभारासंबंधी नियमबाह्य गोष्टी व गैरव्यवस्थापनाबाबत राज्य सरकारकडे मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. त्याशिवाय मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्यास महिलांना बंदी होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्वांची राज्य सरकारने दखल घेतली होती.