
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं कौतुक केलं आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले. इंदुरीकरांचे कीर्तन हे गमतीने भरलेले असते. तसेच त्यांच्या कीर्तनात एक सहजता आहे. कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज जनसामान्यांवर चांगले संस्कार करतात असतात, असे शरद पवार म्हणाले.
मला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बघायला आवडतं. मला आजही त्यांचं कीर्तन ऐकण्याची इच्छा होती. मात्र रात्रीची फ्लाइट असल्याने मला लवकर निघावं लागणार असल्याने मला त्यांना ऐकता येणार नाही. पण पुन्हा कधीतरी मी त्यांचं कीर्तन नक्की ऐकणार आहे, असा शब्द मी त्यांना देतो, असं पवार म्हणाले.
इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामधील काही विधानांमुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे इंदुरीकर महाराजांना ट्रोल देखील करण्यात आले होते. सोशल मीडियावर अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करून इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी काही काळ विश्रांती घेतली. मात्र आता थेट शरद पवारांनीच इंदुरीकर महाराजांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
































































