
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत ते राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीवरून सर्वच पत्रकारांनी शरद पवारांना त्याबाबत विचारले. यावर शरद पवार यांनी अत्यंत शांत व संयमी उत्तर दिले. ”सगळ्यांनीच पत्रकार परिषदेला उपस्थित रहावं असा काही नियम नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांच्या समितीने माझा राजीनामा नामंजूर केला त्या समितीत अजित पवार देखील होते. ते स्वत: आले होते मला तो निर्णय सांगण्यासाठी’ असे शरद पवार म्हणाले.
त्यानंतर पत्रकारांनी पक्षातील काही लोकं भाजपच्या वाटेवर होते त्यांना थांबवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला होता का? त्यावर शरद पवार म्हणाले की, कोणीही जाणार असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. उलट अशा परिस्थितीत ज्याच्याकडे नेतृत्व असतं त्याला अधिक खंबीरपणे उभं राहून पक्षाला मजबूती द्यायची असते. मात्र अशी कोणतीही परिस्थिती आमच्या पक्षात नव्हती”


























































