संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा…मी याकडे गांभीर्याने बघत नाही! – शरद पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर आणि धाराशीव असा उल्लेख आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या. आज पुन्हा याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ‘आमच्यात वाद नाहीत, संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा… नाही तर आणखी काही म्हणा, या प्रकरणाकडे मी गांभीर्याने बघत नाही,’ अशी प्रतिक्रिया देत संभाजीनगर, धाराशीववरून वाद निर्माण करणाऱयांना चोख उत्तर दिले.

‘सीएमओ’ ट्विटर हँडलवर संभाजीनगर असा उल्लेख आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ‘आपण नवीन काहीच केले नाही’ असे स्पष्ट केले होते.

महाविकास आघाडीच्या अजेंडय़ाची आठवण करून देताना ‘औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंडय़ात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही,’ असेही सुनावले होते. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘या चर्चा आता थांबवा, मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना आमचे म्हणणे पटवून देऊ’ असे स्पष्ट केले होते.

याबाबत शुक्रवारी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांना विचारले असता त्यांनीही प्रश्न विचारणाऱयांना ‘आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा नाहीतर अजून काही म्हणा. या प्रकरणाकडे मी गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केले नाही,’ असे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.

आपली प्रतिक्रिया द्या