
महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्या वेळेला शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनी काय केले असते, हा विचार डोक्यात येतो आणि जो क्रायसिस निर्माण झाला आहे त्याचे उत्तर सापडते, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचे गुपित उघड केले.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘कनेक्ट महाराष्ट्र कन्क्लेव्ह’ कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली. याप्रसंगी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, कन्हैयाकुमार, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. या मुलाखतीसाठी युवकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.
‘दी कश्मीर फाइल्स’ चित्रपटात कश्मीरमधील खोटी स्थिती दाखविली गेली. कश्मिरी पंडितांच्या हत्या होत होत्या, त्या काळात केंद्रात भाजपच्या समर्थनाचे सरकार होते, तर आज केंद्रात भाजपचेच सरकार आहे. पंडितांना संरक्षण देण्यात भाजप कमी पडत आहे. पण, अशा चित्रपटांच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवून लोकांची दिशाभूल आणि धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात आहे, अशी टीका पवार यांनी केली.
‘महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भविष्य अनेकजण वारंवार वर्तवित होते. मात्र, हे सरकार योग्य ट्रकवर चालले आहे हे पाहून अडीच वर्षांनंतर त्यांनी भविष्य सांगायचे बंद केले’, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला. ‘धर्माचे आमिष दाखवून युवकांना भडकवण्याचे काम सध्या सुरू असले तरी त्याला यश येणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
नास्तिकपणाच्या आरोपावर पवार म्हणाले, ‘हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याचा गवगवा करीत नाही; पण पंढरपूरचा विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो. सामान्य माणूस त्याला संकटमोचक मानतो. त्याचा अनादर करू नये म्हणून मी हात जोडतो.’
मुख्यमंत्री असतानाची शरद पवार यांनी एक आठवण नमूद केली. ते म्हणाले, ‘एकदा माझ्या मतदारसंघातील एक महिला मी मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन मुंबईत आली. मी त्या महिलेला म्हटलं, कुसुम काय काम काढलं? मी नावाने हाक मारल्यावर ती तिचे कामच विसरून गेली आणि गावाकडे सगळ्यांना सांगितले की, मला साहेबांनी नावाने ओळखले. आधी माझ्या मतदारसंघातील पन्नास टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसे नाही. आता त्याने आजोबांचे नाव सांगितलं की कळतं, हा कोणाचा आहे.’
सावंत म्हणाले, ‘देशावर, लोकशाहीवर गंडांतर आल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ही परिस्थिती जोपर्यंत राहील तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार असेल.’
































































