मला भाजपसोबत जायचे नाही, संघर्ष करायचा आहे; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गटाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या गटाने शरद पवार यांची विनवणी करत त्यांना एकत्र काम करण्याबाबत विनंती केली, तसेच याबाबत त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेवेळी शरद पवार यांनी मौन बाळगले होते. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मला भाजपसोबत जायचे नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे, असे म्हणून शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला आहे.

अजित पवार गट यशवंतराव चव्हाण सेंटरमधून शरद पवार यांची भेट घेऊन निघानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची एक बैठक झाली. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातून गेलेल्या लोकांनी झालेल्या घटनांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते जर माघारी आले तर पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार यांच्या गचातील सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, आम्ही शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना एकत्रित काम करण्याबाबत विनंती केली. मात्र शरद पवारांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो. आम्ही शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे, असी विनंती देखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.