
भाजप राम मंदिराचे राजकारण करते की व्यवसाय, त्यांनाच ठाऊक, असा घणाघात राम मंदिर उद्घाटन सोहळय़ाच्या आमंत्रणावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अयोध्येत राम मंदिर उभारले गेले त्याचा आपल्याला आनंद आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळय़ाचे निमंत्रण आपल्याला मिळाले नाही, असे सांगतानाच साधारणपणे पूजा-अर्चना ज्या ठिकाणी असते तिथे मी जात नाही. तरीही प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा असते त्याला आपला विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल पत्रकारांनी विचारले असता निवडणुकांचे निकाल अपेक्षेनुसार लागलेले नाहीत, पण त्यामुळे नाउमेद झालेलो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकत्रपणे लढली तर देशात सत्तापरिवर्तन शक्य आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याविषयी विचारले असता, ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यावर चर्चा सुरू असून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे पवार यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दक्षिणेकडून भारत जोडो यात्रा सुरू केली होती. आता ही यात्रा उत्तर हिंदुस्थानातूनही व्हावी, अशी सूचना काही सहकाऱयांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत केली. त्यानुसार आता राहुल यांनी पुन्हा यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता आपण उद्या अचलपूर तालुक्यात जात आहोत. कडू यांनी निमंत्रण दिले आहे, परंतु त्यांच्याशी होणारी भेट राजकीय स्वरूपाची नाही, असेही पवार म्हणाले.
– विरोधकांच्या अनुपस्थितीत तीन महत्त्वाची विधेयकेही पारीत करण्यात आली, त्यावर चर्चा होणे आवश्यक होते. हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे पवार म्हणाले.
– इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱयाबाबत पत्रकारांनी विचारले असता, आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा आधी ठरवणे आवश्यक नाही, असे पवार म्हणाले.


























































