रायगड मतदारसंघाचा निकाल काय लागेल? शरद पवार यांनी आधीच सांगून टाकलं

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळीही शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली असून रायगड मतदारसंघाचा निकाल काय लागेल, हे या सभेतून त्यांनी सांगून टाकलं आहे.

सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, रायगडमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर आघाडीचे सर्व पक्ष एकसंघ राहतील याची काळजी घेतली गेली पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाचे योगदान यात महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेकाप यांच्या सामूहिक प्रयत्नातून यश मिळायला आता काही अडचण नाही. त्यामुळं कोण उभं राहिलं तरी काही अडचण नाही. या ठिकाणचे लोक परिवर्तन घडवण्यासाठी इच्छुक आहेत, असं म्हणतानाच त्यांनी महाविकास आघाडी ही जागा जिंकेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की, अनेक लोकांना समाजकार्यात येण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो. त्यातील काही लोक आपल्या विचारांशी प्रामाणिक असतात काहीं लोक विचार सोडून देतात. आता जे काही झालं ते महाराष्ट्रातील माणूस पाहत आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्याचा निकाल रायगड जिल्ह्याच्या परंपरेला शोभेल असा लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

तुतारी या आपल्या चिन्हावर बोलताना शरद पवार यांनी ट्रम्पेटवरून झालेल्या घोळाविषयी स्पष्ट केलं. ‘मला त्यात काही अडचण वाटतं नाही. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आणि अपक्ष उमेदवाराचं ट्रम्पेट हे चिन्ह आहे. ट्रम्पेट हे चिन्ह सातारा बारामती आणि माढा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. ट्रम्पेट चिन्ह ज्याला मिळालं आहे ते चिन्ह पहिल्या बारामध्ये येणार नाही आणि मशीनवर पहिली बारा चिन्हं येतात, त्यामुळे ट्रम्पेट चिन्ह बघायची वेळच येणार नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले.