निकालाआधी नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर…! शरद पवारांची त्या भेटीवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सत्तासंघर्षातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय उद्या होणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाअगोदर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट चर्चेत आली आहे. या भेटीवर शरद पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की, ‘ज्यांच्यापुढे केस आहे (विधानसभा अध्यक्ष नार्वेकर) आणि ज्यांची केस आहे (मुख्यमंत्री शिंदे) ते जाऊन भेटतात इथेच संशय निर्माण होतो आहे’. यापुढे बोलताना त्यांनी ‘राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे’, असा सल्ला देखील दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. बिल्कीस बानो प्रकरणात आरोपींना पुन्हा जेल मध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरातमध्ये बिल्कीस बानो या भगिनीबाबत जे घडलं होतं ते वाईट होतं. निर्णय उशीरा लागला परंतु योग्य निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलं की, महाराष्ट्र सरकारनं निर्णय घ्यावा. त्या भगिनीला न्याय देण्याच्या बाबत कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश सरकार ठेवणार नाही. सरकारने असा निर्णय घ्यावा ज्यामुळे त्या भगिनिला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र सरकार याबाबत योग्य निर्णय घेईल असं वाटतं. राजकीय हस्तक्षेप होतं असतात मात्र माझी अपेक्षा आहे या केस बाबत असे होऊ नये’, असा आशावाद देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.