
अनेक दिवसांपासून सातत्याने टिपेला पोहोचलेला मुंबई शेअर बाजाराचा ‘उच्चांकी’ फुगा गुरुवारी अखेर फुटला. सेन्सेक्स तब्बल 1159 अंकांनी धाडकन कोसळला. सहा महिन्यानंतर ही मोठी पडझड झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल 4.82 लाख कोटी रुपये अवघ्या काही तासांत बुडाले.
गुरुवारी सकाळी बाजार उघडताच घसरण सुरू झाली. सुरुवातीला सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला. त्यानंतर दिवसभर पडझड सुरूच होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स 1159 अंकांनी कोसळला. सेन्सेक्स 59 हजार 984 अंक इतका खाली आला. एका दिवसात सर्वात मोठी घसरण 12 एप्रिलनंतर झाली. 12 एप्रिलला 1708 अंकांनी सेन्सेक्स कोसळला होता.
गुरुवारी मुंबई शेअर बाजारात केवळ सहा कंपन्यांचे शेअर्स वधारले. यामध्ये एल ऍण्ड टी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेण्टस, मारुती, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक याचा समावेश आहे.
ज्यांना सर्वाधिक फटका बसला यामध्ये आयटीसीचे शेअर्स सर्वाधिक 5.54 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, ऍक्सीस बँक, टायटन, एसबीआय आणि एचडीएफसीचे शेअर 4.39 टक्क्यांनी खाली आले.































































