
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आहे. बाजारातील या तेजीमुळे शुक्रवारी कामकाजाच्या शेवटच्या दिवशी बाजाराने ऐतिहासिक उच्चांक नोंदवला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने शुक्रवारी ऐतिहासिक 58 हजारांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी सकाळी 9.19 वाजता निर्देशांक 263 अंकांची वाढ नोंदवत 58,115.69 वर पोहचला होता. राष्ट्रीय शेअर बाजारही तेजीत असून निफ्टीचा निर्देशांक 17,311.95 वर पोहचला आहे.
शुक्रवारी सकाळी बाजाराला सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 131 अंकांची वाढ नोंदवत 57,983.45 अंकावर सुरू झाला. त्यानंतर त्यात वाढ होत काही वेळातच तो 58,115.69 वर पोहचला होता. तर निफ्टीच्या निर्देशांकानेही 28 अंकांची वाढ नोंदवत 17,262 वर सुरूवात केली. त्यानंतर त्यात 77 अंकाची वाढ होत निर्देशांक 17,311.95 वर पोहचला होता.
बाजाराच्या सुरुवातीला 1315 शेअर तेजीत होते. तर 348 शेअरमध्ये घरसण झाली. तर 98 शेअरचे दर स्थिर होते. जागतिक बाजारपेठेत तेजी असल्याने मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजी आली आहे. आशियाच्या बाजारातही तेजी असून अमेरिकेचा बाजारही तेजीत आहे. अमेरिकेत गुरुवारी एस अँड पी 500 आणि एनएएसडीएक्यू तेजीत बंद झाले होते. तीन दिवसांच्या दबावानंतर बाजारात 131 अंकाची तेजी आली होती. अमेरिकेत शुक्रवारी जारी होणाऱ्या ऑगस्टच्या जॉब रिपोर्टवर आता सगळ्यांचे लक्ष आहे. तो रिपोर्ट सकारात्मक आल्यास बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी आहे. गुरुवारी चढउतारानंतर बाजार तेजीतच बंद झाला होता. बाजार बंद होताना निर्देशाकांत 514.33 अंकांची म्हणजेच 0.90 टक्क्यांची वाढ होत बाजार 57,852.51 अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी बाजाराने 58 हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. तर गुरुवारी निफ्टीच्या निर्देशांकात 157.90 अंकांची म्हणजेच 0.92 टक्क्यांची वाढ होत तो 17,234.15 अंकांवर बंद झाला होता.


























































