
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱया शाळांना अटकाव घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाबाबत नवे नियम तयार केले आहेत. शाळेतील विद्यार्थी प्रवेशावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेत प्रवेश देखरेख समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रवेशावेळी विद्यार्थी, पालकांचे फोटो, आधारकार्ड आवश्यक असणार असून पालकांना दोन प्रतींमध्ये शाळा प्रवेशअर्ज भरावा लागणार आहे.
बीड जिह्यात बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून संस्थाचालक व शिक्षण विभागातील काही अधिकाऱयांनी राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक प्रवेशाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समिती यापुढे प्रवेश देखरेख समिती म्हणून काम पाहणार असून ही समिती शाळेच्या प्रवेश प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवणार आहे. त्याचबरोबर पालकांकडून दोन प्रवेशअर्ज भरून घेऊन त्यांतील एक प्रत प्रवेश देखरेख समितीकडे व एक प्रत केंद्रप्रमुखाकडे असणार आहे.
तर शाळेवर गुन्हा दाखल
हजेरीपटाच्या पडताळणीदरम्यान काही विसंगती आढळल्यास एक महिन्यात चौकशी पूर्ण करून संबंधित शैक्षणिक संस्थेविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच सदर संस्थेचे अनुदान परत घेण्याबाबत किंवा थांबविण्याबाबत शिवाय शाळेची मान्यचा काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. याविषयीचे शासन परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे.
शाळा प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना
– प्रवेशअर्जावर पालकांची स्वाक्षरी आवश्यक.
– प्रवेशअर्जासोबत विद्यार्थी, पालकांचे आधारकार्ड घेणे.
– महिन्याच्या शेवटी हजेरीपटाच्या प्रती शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांनी तपासाव्यात.
– वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटपडताळणी.
– हजेरीपटावरील विद्यार्थ्याचे नाव आणि प्रवेशअर्जातील तपशीलाची पडताळणी.

























































