मुख्यमंत्र्यांच्या सभेला अलाहाबादचे कोळी आले होते का? आदित्य ठाकरेंचा टोला

काल माझ्या मतदारसंघामध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री आलेले. सभेला कोळी बांधव आल्याचे दाखवण्यासाठी टोप्या घालून बसवले. पत्रकाराने एकाला प्रश्न विचारला तर तो हिंदीमध्ये उत्तर देऊ लागला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला अलाहाबादचे कोळी आणून बसवले की काय, असा टोला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. शिवसंवाद यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील रामनगर येथे ते निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

महाराष्ट्र सध्या कठीण प्रसंगातून जातोय. आपल्या बाजूला लोकांची गर्दी, तर त्यांच्या सभेला खुर्च्यांची गर्दी होते. खुर्च्यांसाठी गद्दारी केली आणि समोरही मोकळ्या खुर्च्यात दिसून लागल्या, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. निष्ठावंत लोकं, महाराष्ट्रप्रेमी माझ्या समोर आणि सोबत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. यादरम्यान उपस्थितांनी ’50 खोके, एकदम ओके’च्या घोषणा दिल्या.

घोषणाबाजी सुरू असतानाच आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांनी खोके घेतलेत त्यांच्यासमोर घोषणा दिल्यातर पोलीस मागे लागतील, घरावर धाडी पडतील. कारण या घोषणा ऐकूण त्यांचा जीव जळतो. खोके तर घेतले आणि यांना कसे कळाले असे त्यांना वाटते, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मिंधे गटाचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, गद्दार गँगमधील प्रत्येकाला मंत्री बनायचे आहे. 40 जणांना मंत्री करायचे झाले तर तीन-चार राज्याही पुरायचे नाहीत. पण मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही, त्याआधीच हे सरकार पडणार.

हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा! आदित्य ठाकरे यांचं मिंधे सरकारला आव्हान

जीथे मिळेल तिथे हाथ मारत आहेत

सर्वोच्च न्यायालयात आपण लढत आहोत. हे सगळे होत असताना संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे गेलो तर 40 गद्दार बाद होणार आणि सरकार पडणार. हे अल्पायुषी सरकार आहे, त्यामुळे जीथे मिळेल तिथे हाथ मारत आहेत. ‘स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’ हे धोरण घेऊन पुढे जाणाऱ्यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांनी माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.