झाकलेल्या बांधकामामुळे विद्रूपीकरण, कबूतरखाना हटवून रस्ता रुंदीकरण करा; शिवसेनेची पालिकेकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरमधील कबूतरखाना गेल्या ऑगस्टमध्ये बंद केल्यापासून ताडपत्रींनी बांधून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा ढाचा विद्रूप दिसत असल्याने स्थानिकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कबूतरखान्याचा ढाचा पूर्णपणे हटवून रस्ता रुंदीकरण आणि आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना आमदार महेश सावंत यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदनही दिले आहे.

कबुतरांमुळे मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशाने दादर येथील कबुतरखाना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रचंड विरोधानंतरही पालिकेने हटवला. मात्र हा कबूतरखाना बंद करण्यात आला असला तरी ढाचा मात्र ताडपत्रीने बंदिस्त करून ठेवण्यात आला आहे. हे दृष्य मुंबईच्या मध्यवर्ती दादरच्या विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणाबाबत पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी केली आहे.

…म्हणूनच झाली होती कारवाई

दादर कबुतरखाना ही गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईची एक ओळख बनली होती. मात्र या ठिकाणी अनधिकृत बांधकामही झाले. शिवाय कबुतरांच्या विष्ठsमुळे माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने कबुतरखाना हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर सरकारचे निर्देश आणि न्यायालयाच्या आदेशानुसार हा कबुतरखाना बंद करण्यात आला.