महाराष्ट्रात कर्जमुक्ती झालीच पाहिजे, आदित्य ठाकरे यांची गर्जना

सामना ऑनलाईन । धुळे/मालेगाव

‘महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे व शिवसेना ती करून राहणारच’, अशी गर्जना शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी धुळे व मालेगाव येथील सभेत केली. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी धुळे व मालेगाव य़ेथे सभा झाल्या असून या दोन्ही सभांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी त्यांनी जनआशीर्वाद यात्रा ही त्यांची तीर्थयात्राच असून इथल्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी ही यात्रा काढल्याचे देखील सांगितले.

धुळे व मालेगाव येथे सभेच्या वेळी भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून राहणारच असा विश्वास व्यक्त केला. ‘ फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली तेव्हा शिवसेनेच्या काही अटीशर्ती होत्या. त्यात पहिली अट ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होती. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे व शिवसेना ती करून राहणारच. दुष्काळामुळे सध्या इथली परिस्थिती भीषण आहे. 2012 पासून मी दुष्काळी दौरा करतोय. सामूहिक लग्न, पाण्याचे टँकर पाठवणे या सगळ्या गोष्टी आपण करत आलोच आहोत. पण हा दुष्काळ मागच्या वर्षी पेक्षा वेगळा आहे. साधारणत: आपल्याकडे दुष्काळ एप्रिलपासून सुरू व्हायचा. पण यंदा दुष्काळ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे आणि तेव्हापासून मी फिरतोय. जिथे जिथे गरज आहे तिथे जाऊन लोकांना काय पाहिजे ते बघून मदत करणं हे महत्त्वाचं असतं. आपण चारा छावण्या, महाप्रसाद सुरू केले आहेत. शेतकऱ्यांसाठी जे जे गरजेचे आहे ते ते आपण करत राहणार आहोत हे वचन द्यायला मी आलेलो आहे. पण हे करत असताना तुमच्या मनात काय आहे, तुमच्या समस्या, इच्छा काय आहेत हे देखील जाणून घ्यायला मी आलेलो आहे. माझ्या या यात्रेला मी तीर्थयात्रा समजतो. तीर्थयात्रा म्हणजे आपण चारधामला जातो अष्टविनायकला जातो, मंदिरात जातो. पण मला माझ्या आजोबांनी शिकवलंय खरोखरंच काम करायचंय, समाजसेवा करायचीय, लोकांमध्ये राहायचंय तर एकच आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते म्हणजे जनतेचे आशीर्वाद. त्यामुळे आम्हाला नेहमी हे सांगण्यात आलं की नम्रपणे लोकांमध्ये जा आणि लोकांची कामं करा’, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना भूमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी देखील लढा देत राहिल असे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.’गेल्या काही वर्षांपासून इथले प्रकल्प रखडले आहेत. बरीचशी कामं झालेली नाहीत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामांसाठी इथल्याच भूमीपुत्रांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. इकडच्या भूमीपुत्रांना त्यांचे न्यायहक्क मिळाले पाहिजेत. ती सर्व कामं इकडच्या इक़डे झाली पाहिजे त्याचा पाठपुरावा आम्ही करणार व ते आम्ही करून घेणार. काही ठिकाणी वीस वीस वर्ष झाली प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांची निवेदनं मिळाली आहेत. ती कामं मार्गी कशी लावायची. ती काम लोकांसाठी करून कशी घ्यायची त्यासाठी मी निघालोय. तुमच्या साथीने नवीन महाराष्ट्र घडवायला मी निघालो आहे’, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या