
काही आमदार महाराष्ट्रातून सुरतला गेले. ते ‘मिसिंग’ असल्याचे वृत्तपत्रातून वाचले. आमच्या मागे राष्ट्रीय शक्ती असल्याचे मीडियात स्टेटमेंट करीत योग्य निर्णय घेऊ असे सांगत होते. याचाच अर्थ पक्षांतर करण्याची त्यांची मानसिकता होती, असे शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले. त्याचवेळेस मुख्य प्रतोदपदावरून काढण्याचा अधिकार आमदारांना नाही, असेही प्रभू यांनी ठणकावून सांगितले.
आमदार अपात्रतेच्या मुद्दय़ावरून विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या आजच्या चौथ्या दिवशी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. त्यावेळी त्यांनी 21 जून रोजी केलेला ठराव, सुरतला गेलेल्या आमदारांचे पक्षांतर, आमदारांच्या सह्या अशा विविध मुद्दय़ांवर सुनील प्रभूंची उलटतपासणी केली.
म्हणून नोटीस बजावली
नोटीस व पक्षांतराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले की, महाशक्तीला जाऊन मिळण्यासाठी सुरतला गेलेल्या काही आमदारांचे पक्षांतर होऊ शकते असे मीडियातील बातम्यांमधून समजत होते. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर होऊ शकते. त्यामुळे पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वास्तवातून नोटीस पाठवली
सरकार अस्थिर होत आहे हे कोणत्या आधारावर दिसले आणि खातरजमा न करता मीडियाच्या बातम्यांवर आपण नोटीस पाठवली का, असा प्रश्न जेठमलांनी यांनी केला. त्यावर सुरतमधील एका हॉटेलमध्ये बसून आमच्या मागे राष्ट्रीय शक्ती असल्याचे स्टेटमेंट करीत होते आणि केवळ मीडिया रिपोर्ट वाचून नव्हे, तर वास्तवातही आमदारांची मानसिकता दिसत होती म्हणून नोटीस पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी ‘नॅशनल’
राष्ट्रीय शक्ती या शब्दाचे भाषांतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘नॅशनल पॉवर’ असे केले. त्यावर महेश जेठमलांनी यांनी हास्य करीत सुनील प्रभूंना ‘नॅशनल’ की ‘अॅण्टी नॅशनल’, असा सवाल केला. त्यावर एका क्षणाचीही विलंब न लावता ‘मी नॅशनल’, असे उत्तर प्रभूंनी दिले.
खोटं आहे
22 जून 2022 रोजी ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याच्या ठरावाला दिलीप लांडे यांनी अनुमोदन दिले नाही. त्यामुळे झालेला ठराव खोटा आहे आणि दिलीप लांडे यांनी ठरावावरील सही आणि त्या दिवशीच्या हजेरीपटावरील सही पूर्णपणे वेगळी आहे असे जेठमलांनी यांनी सांगताच ‘हे खोटं आहे’, असे उत्तर त्यांनी दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख रेकॉर्डवर आहे
निवडणूक आयोग व अध्यक्षांकडे असलेल्या घटनेत शिवसेनाप्रमुख असा उल्लेख आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख असा कोणत्याही पदाचा उल्लेख नाही असे जेठमलानी यांनी विचारताच ‘ते रेकॉर्डवर’ आहे, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.
प्रतोद नियुक्तीचा अधिकार पक्षप्रमुखांचा
मुख्य प्रतोद म्हणून 31 आमदारांनी तुम्हाला पदावरून काढून टाकले. त्यामुळे तुमचा व्हीप लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर मुख्य प्रतोदपदावरून मला हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही. माझी नियुक्ती पक्षप्रमुखांनी केली आहे. पदावरून काढण्याचेही अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत. या पदापासून मला काढण्याचे अधिकार आमदारांनाही नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


























































