
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपताच आलेल्या एक्झिट पोलमधून याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच पाच राज्यातील परिवर्तनाची हवा 2024च्या दिल्लीतील सत्तापरिवर्तनाच्या दिशेने जाणार आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम ही पाचही राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत. 3 डिसेंबरला निकाल लागल्यावर सर्व स्पष्ट होईल, पण एक नक्की की या पाचही राज्यात परिवर्तवन होणार असून या परिवर्तनाची हवा 2024च्या दिल्लीतील सत्तापरिवर्तनाच्या दिशेने जाणार आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसने या पाचही राज्यात जे वादळ निर्माण केले ते 2024च्या परिवर्तनाची झलक आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
सत्तेत आल्यापासून भाजपने काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिली होती. पण राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसमुक्त भारत घोषणा देणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 8-8 दिवस एका राज्यात रहावे लागले, गृहमंत्र्यांना अख्खा देश वाऱ्यावर सोडून निवडणूक प्रचारात फिरावे लागले. हे काँग्रेसमुक्त भारतचे लक्षन नसून 2024 ला भाजपपासूनच भारताला मुक्ती मिळणार असून त्याची ही हवा असल्याचे राऊत म्हणाले. तसेच राजस्थानसह चार राज्यांमध्ये काँग्रेस, इंडिया आघाडीचे सरकार बनले आणि मिझोराममध्येही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत असेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
दत्ता दळवी यांना जामीन मंजूर, मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून झाली होती अटक
दरम्यान, उद्या सकाळी आपण मालेगावच्या कोर्टात हजर राहणार असल्याची माहितीही खासदार राऊत यांनी दिली. गिरणा साखर कारखाना बचावच्या नावाखाली शेतकऱ्यांचे 178 कोटी रुपये मंत्री आणि गद्दारांचे सहकारी दादा भूसे यांनी जमा केले आणि याचा हिशोब मागितल्याने खटला दाखल केला आहे. 178 कोटी रुपये कुठे आहेत? त्याचा हिशोब काय? कारखान्याचे काय झाले? काहीच अतापता नाही. भिमा पाटस कारखान्यात भाजप आमदार राहुल कुल यांनी केलेल्या पाचशे-साडे पाचशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचेही नुसते आरोप नाही तर पुरावे दिले. दादा भूसेंच्याबाबतीतही पुरावे दिले, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही, उलट आमच्यावर खटले दाखल करतात. दादा भूसे यांनी एका कर्ज प्रकरणात पोलिसांवर दबाव आणून शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना तुरुंगात टाकले. हा या राज्यातील कायदा आहे. समान नागरी कायद्याच्या गोष्टी करता, मग हा कायदा कोणाच्या कोठीवर नाचवताय? असा परखड सवाल राऊत यांनी केला.



























































